लोकसत्ता टीम
वर्धा : राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपूरात आटोपला. मात्र, त्यात वर्णी न लागल्याने अनेक इच्छूक आमदार नाराज झाले. काही ज्येष्ठांनी आपली नाराजी जाहीरपणे पण बोलून दाखविली. भाजप तसेच अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या गटातही नाराजीचे सूर प्रकटले.
भाजपमधील नाराज आमदारांची संख्या मोठीच आहे. वर्धा जिल्ह्यातून आमदार डॉ.पंकज भोयर यांची अनपेक्षीतपणे राज्यमंत्री म्हणून निवड झाली. त्यांना मंत्रीपद मिळाल्याने जिल्हा भाजपात आनंद व्यक्त झाला. मात्र, मंत्रीपदासाठी इच्छूक असलेले हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांच्या हितचिंतकात मंत्रीपद न मिळाल्याने नाराजीचे सूर उमटले होते. त्यांच्या काही समर्थकांनी राजीनामे देवू केले. तसेच खुद्द समीर कुणावार यांनीही काही वरिष्ठ नेत्यांकडे नाराजी नोंदविल्याची चर्चा झाली होती.
या पार्श्वभूमीवर आमदार समीर कुणावार यांनी प्रथमच आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की मी नाराज वगैरे काही नाही. मंत्रीपदाचा निर्णय पक्षाचे ज्येष्ठ नेते घेतात. त्यांचा जो काही निर्णय असेल तो मान्य करून सगळे कामाला लागतात. मंत्रीपदाची इच्छा ठेवणे काही गैर नाही. सलग तिसऱ्यांदा निवडून आल्याने हिंगणघाटला मंत्रीपद मिळेल, अशी चर्चा सुरू झाली होती. माझीही अपेक्षा होती. पण मंत्रीमंडळ तयार करतांना विविध बाजू विचारात घेतल्या जातात. म्हणून माझा समावेश झाला नसेल तर मी नाराज असे म्हणता येणार नाही. मी माझ्या विधीमंडळ कार्यात पूर्णपणे सहभागी झालो आहे. जनतेचे प्रश्न मंत्रीपदापेक्षा महत्त्वाचे. ते सोडविण्यात मिळणारे समाधान हे माझ्यासाठी सर्वकाही आहे, अशी भूमिका आमदार समीर कुणावार यांनी मांडली.
आणखी वाचा-अकोला : मध्य रेल्वेचे ७६.४३ कि.मी.चे स्वयंचलित ‘सिग्नलिंग’, फायदे काय जाणून घ्या…
वर्धा जिल्ह्यातून भाजपला शंभर टक्के यश मिळाले. वर्ध्यातून डॉ.पंकज भोयर, आर्वीतून सुमित वानखेडे, हिंगणघाटमधून समीर कुणावार व देवळीतून राजेश बकाने असे चार आमदार निवडूण आले. त्यामुळे जिल्ह्यास मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा भाजप नेते ठेवून होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट हे तशी रदबदली करून आले. त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. कोणत्याही आमदारास मंत्री करा, पण जिल्ह्यास मंत्रीपद द्या अशी भावना गफाट यांनी ज्येष्ठ नेत्यांकडे केली होती. मात्र, डॉ.भोयर यांची वर्णी लागल्यानंतर अन्य गटात धुसफूस सुरू झाली.
तेंव्हा जिल्हाध्यक्ष गफाट यांनी मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त करण्याची बाब चुकीची असल्याचे स्पष्ट केले. एकदा नेत्यांनी निर्णय घेतला की तो मान्य करीत इतरांनी कामाला लागण्याची भाजपाची शिस्त असल्याचे त्यांनी स्पष्ट करून टाकले होते. मंत्रीपद मिळाले नसले तरी उत्कृष्ट आमदार म्हणून बहुमान मिळालेल्या समीर कुणावार यांच्या समर्थकांना आमदार कुणावार हे कदाचीत विधानसभेचे उपाध्यक्ष होवू शकतात, अशी आशा आहे.