वर्धा: जिल्ह्यात प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कुठे व्हावे यासाठी भाजपच्याच नेत्यांमध्ये युद्ध पेटले आहे. आता तर हे महाविद्यालय हिंगणघाट येथेच द्या, अन्यथा माझा राजीनामा, घ्या असे आमदार समीर कुणावार यांनी स्पष्ट करून टाकले. ‘लोकसत्ता ऑनलाईन’सोबत बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्षपद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यांना भेटून मी माझ्या भावना व्यक्त केल्यात. हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथेच व्हावे म्हणून माझ्या शहरातील नागरिकांनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा केला आहे. त्यांना जे हवे त्यासाठी मी ठामपणे त्यांच्या मागे उभा आहे. मला आमदारकी महत्त्वाची नाही. पदाची लालसा नाही. यापूर्वीही जनतेच्या प्रश्नावर मी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मी सरकारला मुदत दिली नाही. पण पुढील काही दिवसात माझा निर्णय झाला असेल, असेही कुणावार भावनावश होत म्हणाले.
हेही वाचा… रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले, यवतमाळात ११ महिन्यात ७९७ अपघात; ३८० जणांनी जीव गमावला
आर्वी येथे महाविद्यालय व्हावे, यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू सुमित वानखेडे यांनी प्रयत्न सुरू केले आहे. त्यासाठी गेल्या आठवड्यात तीनशे खाटांचे रुग्णालय तातडीने मंजूर करून घेतले. दुसरीकडे, हे महाविद्यालय वर्धेत मंजूर झालेच आहे. पण ते आता इतरत्र जावू नये म्हणून आमदार डॉ. पंकज भोयर यांनीही कंबर कसली आहे. या तिघांच्या भूमिकेने सरकारपुढे मोठा पेच उभा झाल्याचे चित्र निर्माण होते. कुणावार यांच्या इशाऱ्यास सरकार किती तत्पर प्रतिसाद देणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.