बाजार समितीतील शिवसेनेच्या सत्कार सोहळ्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या राड्यावरून निर्माण झालेले वादंग आणि राजकीय वादळाची तीव्रता आज चौथ्या दिवशीही कायमच आहे. काल शिवसेनेने केलेल्या निषेधावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आज पुन्हा शिवसेना नेते आणि पदाधिकऱ्यांना खडसावले. आता आमच्या नेत्यांविरुद्ध अर्वाच्च भाषा वापरणाऱ्या जिल्ह्यातील सेना पदाधिकाऱ्यांना घेरून मारू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
हेही वाचा >>> विदर्भात आठ दिवसांत १६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना आ. गायकवाड म्हणाले की, आमचा इशारा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार प्रतापराव जाधव आणि आम्हा आमदारांविरुद्ध गलिच्छ भाषा करणाऱ्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसाठी आहे. मी ३६ वर्षांपासून बाळासाहेब ठाकरेंचा कडवा सैनिक म्हणून कार्यरत आहे. माझ्यावर १५० केसेस आहे, चारदा तडीपारीची कारवाई झाली. मी सर्व विरोधकांना पुरून उरलो. मला छळणाऱ्यांना मी सोडले नाही, आताही सोडणार नाही. बाजार समितीतील कार्यक्रमात आमच्या कार्यकर्त्यांनी संयम बाळगला, एवढेच नव्हे तर पोलिसांना माहितीही दिली. आम्ही ३०० होतो अन् हल्ला करणारे १५- २० होते, पण आम्ही संयम बाळगला, अशा वल्गना विरोधक करताहेत. त्यांना हे ठाऊक नाही की आमचा एकेक कार्यकर्ता पन्नासला भारी आहे. अंगावर घेण्याची भाषा करणाऱ्यांना आम्ही धडा शिकवूच. जिल्हा बंद करू, जाळू अशा वल्गना करणाऱ्यांच्या बापाने कधी शेकोट्या पेटविल्या नाही, ते काय जिल्हा पेटविणार? असा सवालही त्यांनी केला. मारण्याची भाषा करणाऱ्यांनी कधी ढेकूण मारले का? अशा शब्दात आ. गायकवाड यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यां खिल्ली उडविली. मी मर्दानी खेळ करणारा पहिलवान गडी असून आता सेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, खासदार वा आमदारांविरुद्ध गलिच्छ भाषा वापरली तर त्यांना घेरून मारू, असा दमही त्यांनी भरला.