बुलढाणा : भाजप शिंदे, गटासाठी अंतर्गत रस्सीखेच आणि वादंगाचा विषय ठरलेल्या बुलढाणा, यवतमाळ- वाशीम सारख्या लोकसभा मतदारसंघातील तिढा सोडवण्यासाठी भाजपने आता नवीन तोडगा आणल्याचे वृत्त आहे. शिंदे गटाने निवडून येण्याची खात्री नसलेले उमेदवार बदलण्याचा हा तो तोडगा आहे. यामुळे बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड यांची लोकसभेचे उमेदवार म्हणून वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. बुलढाणा मतदार संघात व शिंदे गटात आज सकाळपासून ही चर्चा रंगली आहे. यामुळे खासदार गोटात अस्वस्थता पसरल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली येथे महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर (दि.८) मध्यरात्री उच्च स्तरीय बैठक पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आदी मोजके नेते हजर होते. या बैठकीत जास्त वादाचा विषय ठरलेल्या बुलढाणा, यवतमाळ वर साधक बाधक चर्चा करण्यात आला.

हेही वाचा…चंद्रपूर: वडेट्टीवारांनी लोकसभेसाठी मुलीचे नाव समोर केले! काँग्रेसच्या वर्तुळात…

अमित शहांच्या महाराष्ट्र भेटीत देखील यावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे बैठकीत या तिढ्यावर विस्तृत चर्चा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. बुलढाणा, यवतमाळ – वाशीम, सारखे मतदारसंघ भाजपला सोडण्याच्या मागणीवरून शिंदे गट अन भाजपा यांच्यातील संबंध ताणले गेले. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी जागा बदल ऐवजी उमेदवार बदलाचा पर्याय सुचविला. खासदार प्रतापराव जाधव, भावना गवळी, यांच्याऐवजी शिंदे गटाच्या दुसऱ्या नेत्याला उमेदवारी द्यावी अशी सुचना केल्याचे सांगण्यात आले. बदल केल्यास शिंदे गटाला १२ जागा देण्यावर भाजपने सहमती दर्शविल्याचे समजते समजते.

यामुळे बुलढाणा, यवतमाळ च्या वादग्रस्त उमेदवारीचा चेंडू भाजपने शिंदे गटाच्या कोर्टात ढकलल्याचे मानले जात आहे. प्रतापराव जाधव , भावना गवळी यांच्या उमेदवारी आग्रही असणारे मुख्यमंत्री शिंदे यांना आता या तोडग्यावर निर्णय घेणे क्रमप्राप्त ठरले आहे. या परिस्थितीत आता बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड यांना बुलढाणा लोकसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा…वर्धा : ‘हर्षवर्धन देशमुख नको, समीर देशमुख द्या’, निवडणूक हालचाली वेगात

दुसरीकडे बुलढाण्याचे आमदार गायकवाड यांची लोकसभेसाठी कधीचीच तयारी आहे. आमदार झाल्यावर ,मुंबई गाठल्यावर ‘दिल्ली’ हे त्यांचे पुढील लक्ष्य होते. मात्र पाच वर्षांनी मिळणारी ही संधी त्यांना २०२४ मध्येच मिळण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा……अन् शरद पवार म्हणाले, “राजकारण बाजूला ठेव…”; नितीन गडकरींनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सांगितला ‘तो’ किस्सा

अलीकडेच त्यांनी सोशल मीडियावर संसदेचे छायाचित्र टाकून त्यावर सूचक मजकुरासह टाकलेली पोस्ट गाजली होती. तेंव्हा ती पोस्ट ,खासदार गोट, मित्र पक्षासह जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडविणारी ठरली होती. त्यामुळे खासदार गट सावध झाला होता. त्यामुळे आमदारांना वारंवार खुलासे करावे लागले होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्या चिखली येथील जाहीर सभेत सुद्धा यावर खुलासा करीत हा आपला गनिमी कावा होता असा खुलासा आमदार गायकवाड यांनी केला होता.आता बदलत्या राजकीय स्थितीमुळे खासदारकीची उमेदवारी आणि दिल्लीचे तिकीट त्यांच्याकडे चालून येत असल्याचे मजेदार चित्र आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla sanjay gaikwad may get ticket for buldhana lok sabha constituency bjp gives suggestion to eknath shinde scm 61 psg