बुलढाणा : शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आज एक पर्याय(!) सुचविला आहे. राहुल गांधी यांनी विदेशात केलेल्या कथित आरक्षणविरोधी वक्तव्यासाठी पवित्र दीक्षाभूमी किंवा चैत्यभूमी येथे जाऊन नतमस्तक होऊन घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माफी मागावी, तरच ‘ती’ घोषणा मागे घेऊ, असे त्यांनी आज जाहीर केले. अन्यथा आपण आपल्या घोषणेवर कायमच राहणार, असा इशारा गायकवाड यांनी दिला.
काय म्हणाले संजय गायकवाड?
विदेशात (अमेरिकेत) जाऊन राहुल गांधी यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या आरक्षणाविरूद्ध विधाने केलीत. तसेच आरक्षण संपवायची भाषा केली. यामुळे एक आमदार म्हणून नव्हे तर एक देशभक्त, राष्ट्रप्रेमी नागरिक म्हणून मी त्या विधानाचा निषेध केला. तसेच खासदार राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला आपल्यातर्फे अकरा लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले होते. या पाठोपाठ आपण आज नवीन घोषणा करीत असल्याचे संजय गायकवाड यांनी ठासून सांगितले.
हे ही वाचा… राहुल गांधींच्या जिभेला चटके देण्याच्या वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक ; पोलीस आयुक्तांच्या कक्षात ठिय्या
…मग ‘ती’ घोषणा मागे घेऊ
राहुल गांधी यांनी राजधानी मुंबई येथील चैत्यभूमी अथवा नागपूर येथील दीक्षाभूमी येथे जाऊन नतमस्तक व्हावे. तसेच कथित आरक्षण विरोधी वक्तव्यासाठी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची क्षमायाचना करून दिलगिरी व्यक्त करावी, अशी आपली मागणी आहे. राहुल गांधी यांनी घटनाकरांची क्षमा मागितली तर आपण आपली ‘राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला अकरा लाख रुपयांचे बक्षीस’ ही घोषणा मागे घेऊ, याचा संजय गायकवाड यांनी पुनरुच्चार केला.
हे ही वाचा…पंतप्रधानांचा दौरा अन् प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आज दिवसभर जिल्ह्यात…
गुन्हे नव्हे आभूषण
काँग्रेस नेत्यांच्या तक्रारीवरून राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या स्फोटक विधानाबाबत बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात विचारणा करण्यात आली असता, त्यावर स्मितहास्य करून आमदार गायकवाड म्हणाले की, गुन्हे माझ्यासाठी गुन्हे नव्हे तर आभूषण आहेत. आजवरच्या दिर्घ राजकीय कारकिर्दीत आपल्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. काही गुन्हे मागे घेण्यात आले आहे. गुन्हे दाखल करण्यात आले, यात धन्यता मानण्याऐवजी काँग्रेस नेत्यांनी महापुरुषांबद्दल त्यांच्या मनात खराखुरा आदर असेल तर उद्या बुलढाण्यात आयोजित पुतळे, स्मारक लोकार्पण सोहळ्याला हजर राहावे, असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेस नेत्यांनाही निमंत्रण पत्रिका दिल्या आहेत, त्यांना महापुरुषांबद्दल आदरभाव असेल तर ते कार्यक्रमाला येतील, असे गायकवाड म्हणाले.