वाशीम : आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी करतात. मात्र, त्यांचे आजारपण अडचणीचे ठरत असल्याने त्यांच्या मतदार संघात त्‍यांचे सुपूत्र ज्ञानक पाटणी यांचा वाढता सहभाग चर्चेचा विषय बनला आहे. अनेक विकास कामाचे भूमिपूजन देखील ज्ञानक पाटणी कडून होत असून २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ते भाजप चा चेहरा राहतील का ? यावरून चर्चेला उधाण आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसापूर्वीच भाजपने जिल्हयातील विधानसभा व लोकसभा प्रमुख जाहीर केले. केंद्रात मोदी सरकारला नऊ वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्हयात विशेष संपर्क अभियान राबवून पक्ष बांधणी सुरू केली आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याअनुषंगाने इच्छुक तयारीला लागले आहेत. कारंजा मानोरा मतदार संघाचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी हे मागील काही दिवसापासून आजारपणामूळे मतदार संघात फारसे दिसून आले नसले तरी त्यांच्या गैरहजेरीत त्यांचे सुपुत्र ज्ञानक पाटणी मात्र वर्षभरापासून मतदारांच्या कायम संपर्कात आहेत.

हेही वाचा >>>नागपूर: सौदी अरेबियातून दहशतवादी संघटनेशी जुळला अफसर, कोट्यवधीचा निधी जमवण्याची जबाबदारी

हेही वाचा >>>चंद्रपूर: गडचिरोलीच्या सीमेवर शिकारी सक्रिय, मोठ्या पट्टेदार वाघाची शिकार!

ज्ञानक पाटणी हे भाजप जैन प्रकोष्टचे उपाध्यक्ष म्हणून कार्य करतात. त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम देखील राबविले असून आरोग्य शिबीरे वा इतर उपक्रमात सहभागी होताना दिसतात. ज्ञानक पाटणी यांच्या हस्ते कारंजा व मानोरा तालुक्यात आमदार राजेंद्र पाटणी यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या अनेक विकास कामांचे भूमिपुजन देखील करण्यात आलेले असून मागील वर्षभरापासून त्यांचा मतदार संघातील वाढता सहभाग चर्चेचा विषय बनला आहे. आमदार पाटणी हे दोन वेळा कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातून विजयी झालेले असल्यामुळे यावळेस मात्र त्यांच्या मुलांला विधानसभेच्या आखाडयात उतरवणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून ज्ञानक पाटणी राहतील का ? यावरुन तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. याबाबत आमदार राजेंद्र पाटणी यांना विचारणा केली असता त्यांनी नकार देत ज्ञानक पाटणी हे एखाद्या वेळेस भूमिपूजन किंवा इतर कार्यक्रमास गेले असतील. मात्र, निवडणूक लढणार नसल्याचे सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla son gyanak patni march for assembly elections washim pbk 85 amy
Show comments