गडचिरोली : जिल्ह्यात वन्यप्राणी व मानव संघर्ष शिगेला पोहोचला आहे. लोहखनिज वाहतुकीमुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. निधी नियोजन रखडल्याने अनेक विकास कामे खोळंबली आहे. पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्ह्यात यायला वेळ नाही. त्यामुळे त्यांनी पालकमंत्रीपद सोडून द्यायला हवे, अशी मी त्यांना विनंती करणार आहे. असा टोला आमदार सुभाष धोटे यांनी आज लगावला. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता गडचिरोलीत आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
धोटे म्हणाले की, फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकमंत्री पद स्वतःकडे ठेवले, त्यावेळेस जिल्ह्याचे प्रश्न तात्काळ मार्गी लागेल असे अनेकांना वाटले होते. परंतु त्यांच्याकडे वेळ नाही. त्यामुळे उपलब्ध विकास निधीच्या नियोजनाअभावी जिल्ह्यातील अनेक विकास कामे खोळंबली आहेत. आर. आर. पाटील यांनी सुध्दा गडचिरोलीचे पालकत्व घेतले होते. ते मात्र, वर्षातून ४-५ वेळा जिल्ह्यात भेट द्यायचे. मोठी जबाबदारी असल्याने फडणवीसांकडे वेळ नाही. हे आम्ही समजू शकतो. त्यामुळे त्यांनी पालकमंत्रीपद सोडून इतर मंत्र्याला तरी द्यायला हवे. पूर्णवेळ पालकमंत्री मिळाल्यास जिल्ह्यातील खोळंबलेले विकास कामे मार्गी लागतील, अशी मागणी धोटे यांनी यावेळी केली.
हेही वाचा : नागपूर : विवाहितेची आत्महत्या; मैत्रिणीचा पैशांसाठी तगादा
अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी १२ हजारांची मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधत हे खोके सरकार असून केवळ समाजात भांडणे लावण्याचे कामे करीत असल्याचे म्हटले. येत्या हिवाळी अधिवेशनात मेडीगड्डा, लोहखनिज वाहतूक या प्रमुख प्रश्नांसह जिल्ह्यातील विविध प्रश्न मांडणार असल्याचे आमदार धोटे यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश सरचिटणीस डॉ. नामदेव किरसान, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजीत कोवासे, महिला जिल्हाध्यक्षा कविता मोहोरकर यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते.