चंद्रपूर : जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष तथा राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष धोटे यांनी स्वबळाची भाषा करीत काँग्रेस पक्षाने २०२४ ची निवडणूक स्वतंत्र लढवून १४५ आमदार निवडून आणवे असे सांगितले.
राज्याचे विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्यात आमदार धोटे यांनी भाजपा फोडाफोडीचे राजकारण करीत असल्याची टीका केली. पहिले उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली, त्यानंतर शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून राज्यात तीन पक्षाचे सरकार सत्तेत आणले.
हेही वाचा – “राज्यात दोन अली बाबा व अंशी चोरांचे सरकार,” वडेट्टीवार यांची टीका; म्हणाले…
हेही वाचा – अकोला : केवळ ५० टक्केच पशुधनाचे लसीकरण, ‘लम्पी’चा धोका पुन्हा वाढला
भाजपाला २०२४ मध्ये स्वबळावर सत्ता स्थापन करता येणार नाही याची खात्री आहे. त्यामुळेच अशा फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. या सर्व फोडाफोडीच्या राजकारणात राज्यातील काँग्रेस पक्ष हा एकसंघ राहिला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाबद्दल लोकांच्या मनात सकारात्मक भावना आहे. याउलट भाजपाबद्दल लोकांच्या मनात तिरस्कार निर्माण झाला आहे. राज्यात लोकांकडून काँग्रेस पक्षाला मिळत असलेला प्रतिसाद बघता आगामी २०२४ ची विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवी, १४५ आमदार निवडून आणावे आणि काँग्रेस पक्षाचा मुखमंत्री बनवावा असेही धोटे म्हणाले.