चंद्रपूर : ‘समस्या तुमच्या पुढाकार आमचा’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी २४ मे ला कन्नमवार सभागृहात आमदार सुधाकर अडबाले यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली.
प्रलंबित समस्यांची समाधानकारक माहिती न दिल्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांना आमदार सुधाकर अडबाले यांनी चांगलेच धारेवर धरले. सभेत चुकीची माहिती दिल्यानंतर आमदारांनी आक्षेप घेताच माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी माफीही मागितली. या माध्यमातून माध्यमिक शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातील जवळपास २५ सामूहिक व अनेक प्रलंबित असलेल्या वैयक्तिक समस्या चर्चेत आल्या.
हेही वाचा >>>अबब! सहा हजाराचा कोंबडा तर चार हजाराची कोंबडी
माध्यमिक विभागातील समस्यांची उत्तरे देताना शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांची चांगलीच दमछाक झाली. अनेक समस्यांचे समाधानकारक उत्तरे न दिल्यामुळे बैठकीत वातावरण तापले. २४ मे २०२३ रोजी समस्यांवर बैठकीचे आयोजन असताना कार्यालयातील काही जबाबदार अधिकाऱ्यांना सुट्टी मंजूर केल्याबद्दलचा मुद्दाही ऐरणीवर आला.
त्यात शिक्षणाधिकाऱ्यांना स्पष्ट उत्तर देता आले नाही. प्रलंबित समस्यांचे स्पष्टीकरण देताना प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना चांगलाच घाम फुटला. या सभेमध्ये अधिकारी व समस्याग्रस्त कर्मचारी आमने सामने आल्यामुळे आमदारांसमोर अधिकाऱ्यांचा चांगलाच धुराडा उडाला. सभेसाठी शिक्षणाधिकाऱ्यांची समाधानकारक कुठलीही पूर्वतयारी नसल्यामुळे शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला. अनेक शासकीय आकडेवारी देखील त्या सांगू शकल्या नाही. ही सभा दुपारी एक वाजता सुरू झाली.
हेही वाचा >>>चंद्रपूर: ब्रम्हपुरी वनपिरक्षेत्रात आढळला दुर्मिळ ‘फोस्र्टेन कॅट स्नेक’
सायंकाळी साडेसहा वाजले तरी सभा सुरूच होती. या सभेमुळे प्राथमिक व माध्यमिक विभागातील समस्याग्रस्त शिक्षकांमध्ये समाधानचे वातावरण होते. प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी घेतलेल्या या उपक्रमाचे कर्मचारी व संघटनांनी आमदार सुधाकर अडबाले यांचे आभार व्यक्त केले.
जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील प्रलंबित सामुहिक व वैयक्तिक प्रकरणे तात्काळ निकाली काढावी व याच विषयांवर जुलैच्या पहिल्या आठवड्यात आढावा बैठक घ्यावी, असे निर्देश आमदार अडबाले यांनी शिक्षक विभागास दिले.
सभेला माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाकर्डे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) दीपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण, उपशिक्षणाधिकारी देशमुख, उपशिक्षणाधिकारी निकिता ठाकरे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष जयप्रकाश थोटे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, कार्यवाह श्रीहरी शेंडे, जगदीश जुनघरी, शिक्षक विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, समस्याग्रस्त, शिक्षक, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा >>>चंद्रपूर: नागपूर-हैदराबाद ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ होणार सुरू
प्रलंबित समस्यांवर चर्चा
प्राथमिक शिक्षण विभागातील उच्च श्रेणी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांच्या पदोन्नती करण्याबाबत चर्चा करणे, चटोपाद्याय वेतनश्रेणी लागू असलेल्या शिक्षकांना एकस्तर वेतन श्रेणी चालू ठेवणे व भविष्यात अतिप्रदान वसुली न करणे, सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या दुसरा व तिसरा हप्ता अदा करणे, शाळेमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०, २०, ३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना लागू करणे यासह अनेक प्रलंबित विषयावर चर्चा करण्यात आली.