वर्धा : अनिश्चितता तुझे दुसरे नाव राजकारण, असे म्हटले जाते. राजकारणात केव्हा शत्रूचा मित्र व मित्राचा शत्रू होईल, हे सांगता येत नसल्याचे दाखले दोन वर्षात महाराष्ट्रातच लोकांनी पाहले. त्यामुळे एकाचा विश्वासू दुसऱ्या दारी दिसला की लोकांच्या भुवया उंचावतात. तसेच हे. पण गैर नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार सुमित वानखेडे हे किती विश्वासू, हे राज्याला सांगायला नको. विद्यमान भाजप आमदाराची तिकीट कापून वानखेडे यांना तिकीट मिळाली आणि त्यां नंतर झालेली बंडाळी व ती शांत करण्यासाठी झालेली धावपळ महाराष्ट्र विसरला नाही. वानखेडे साठी वाटेल ते, असा हा प्रकार भाजपने बघितला. वानखेडे यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांच्यासाठी प्रचाराची राज्यातील वेळ राखून शेवटची सभा फडणवीस यांनी आर्वीत घेतली. सुमित कसा चांगला याचे गुणगान त्यांनी केले.

पण आता हेच आमदार सुमित वानखेडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी भेट घेत असल्याचे छायाचित्र उमटले  आणि तर्कवितर्क सूरू झाले. कारण गडकरी व फडणवीस असे राज्यात दोन छुपे गट भाजपात असल्याची नेहमी चर्चा होत असते. जेव्हा विधान सभा किंवा परिषद निवडणुकीत तिकीट देण्याची वेळ येते तेव्हा असे गट व असे समर्थक असल्याची चर्चा होत असल्याचे लपून नाही.

असा संदर्भ भाजप अंतर्गत राजकारणात असल्याने आज आमदार वानखेडे हे जेव्हा गडकरी यांना भेटले व तशी छबी खुद्द वानखेडे यांनी प्रसारित केली तेव्हा नेमकी भेट कशासाठी,  असे प्रश्न आले. यावर लोकसत्ताने विचारणा केल्यावर आमदार वानखेडे यांनी खरे काय ते उघड केले. ते म्हणतात, केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी अंतर्गत आर्वी विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांच्या विकासासाठी मंजूर झालेल्या निधीबद्दल आज आमचे नेते केंद्रीय रस्ते विकास मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांचे मन:पूर्वक आभार मानले.

आर्वी-शिरपूर रस्ता (आर्वी तालुका) — ९ कोटी

आर्वी-हरदोली-दहेगांव-बेढोणा-चिंचोली-पाचोड-हिवरा-बेल्हारा-पांजरा रस्ता ५ कोटी

आष्टी तालुक्यातील आबाद वडाळा-साहूर-माणिकवाडा रोडवरील पूल बांधकाम — १ कोटी,असा एकूण१५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

हा निधी मंजूर करून आपल्या भागातील रस्त्यांच्या दर्जात लक्षणीय सुधारणा घडवून आणणाऱ्या नितीन गडकरी यांचे पुनश्च एकदा मन:पूर्वक आभार, असे वानखेडे म्हणाले.

या भेटीत गडकरी यांनी वानखेडे यांना एक सल्ला पण दिला. त्याबाबत आमदार वानखेडे म्हणतात की गडकरी म्हणाले की तुझ्या आर्वी मतदारसंघात संत्रा उत्पादक मोठ्या प्रमाणात आहे. तू कार्यशाळा घे. त्यांना तज्ञ् बोलावून मार्गदर्शन कर. त्यांचे भले कसे होईल याचा विचार करीत संत्रा विषयक प्रकल्प मार्गी लाव, असे गडकरी यांनी सुचविले. माझ्यासाठी ती आज्ञा असल्याचे मी मानतो व तसा अंमल करतो, असे मत आमदार वानखेडे यांनी व्यक्त केले आहे.