बुलढाणा: महाराष्ट्रात बेरोजगारीचा भस्मासूर वेगाने फोफावत आहे. राज्यकर्त्यांच्या दुर्लक्ष व शोषणाचा बळी ठरलेल्या विदर्भातच रोजगारहीनांची संख्या तब्बल ६६ लाखांपर्यंत असल्याची धक्कादायक माहिती स्वतंत्र विदर्भ राज्य चळवळीचे प्रमुख नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी दिली. यावर एकमेव उपाय म्हणजे स्वतंत्र विदर्भ राज्य असून ती काळाची गरज असल्याचे आग्रही प्रतिपादनही त्यांनी केले.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील कृषी वैभव लॉन्स येथे रविवारी संध्याकाळी विदर्भ निर्माण संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्याच्या अध्यक्षपदावरून बोलताना त्यांनी वरील दावा करून स्वतंत्र विदर्भ राज्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित केली. त्यांनी विदर्भाच्या विदारक स्थितीचे आकडेवारीसह अभ्यासू विवेचन केले. आजवरच्या सत्ताधा-यांनी विदर्भ प्रांताकडे अक्षम्य दुर्लक्षच केल्याचे ते म्हणाले. नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध विदर्भाच्या सर्वंकष शोषणावर त्यांनी प्रकाश टाकला. पत्रकार प्रकाश पोहरे यांनी मेळाव्याचे उद्घाटन केले.
हेही वाचा… सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा कमीच; पश्चिम विदर्भाच्या बाजारातील चित्र
प्रमुख अतिथी म्हणून अर्थतज्ज्ञ डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले, रजनी मामर्डे, सुकाणू समिती सदस्य रमेशकुमार गजबे , प्रभाकर कोंडबत्तूनवार, पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार, मुकेश मासुरकर, विभागीय अध्यक्ष सम्राट डोंगरदिवे, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अॅड. सुरेश वानखेडे, शेतकरी संघटनेचे वामन जाधव, श्याम अवथाडे, तेजराव मुंडे, दामोदर शर्मा, कैलास फाटे, राम भारुडे, जयवंत जाधव, ज्ञानेश्वर देवकर, प्रकाश अवसरमोल, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सुरेश वानखेडे यांनी केले.