चंद्रपूर: राज्यात सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर जनसामान्यांच्या प्रतिक्रिया नेत्यांच्या तोंडात शेण घालणाऱ्या आहेत. केंद्र व राज्यातील सत्ताधाऱ्यांनी राजकारण ऐवढे नासवले आहे की, आम्हाला आमदार म्हणवून घ्यायला लाज वाटते, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री, माजी विरोधी पक्ष नेते तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.
राज्यातील तथा देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर माध्यमांपुढे भाष्य करताना वडेट्टीवार यांनी राज्यातील एकूणच राजकीय परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. फोडाफोडीच्या राजकारणामुळे सामान्य जनतेचा काँग्रेस पक्षावरील विश्वास वाढतो आहे. वंचित बहुजन सारख्या समविचारी पक्षांची मोट बांधणे क्रमप्राप्त झाले आहे. प्रकाश आंबडकर यांच्यासोबत जाण्यास काँग्रेस तयार आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील अशी चर्चा सुरू हे.
हेही वाचा >>>बुलढाणा: पुन्हा एक वरिष्ठ आमदार अजित पवारांच्या गोटात! म्हणाले, मनावर दगड ठेऊन…
स्थानिक पातळीवर काँग्रेस नगर परिषद, जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीसाठी तयार असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले. शिवसेना व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षानंतर आता काँग्रेस पक्षातही मोठी फुट पडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याबाबत छेडले असता, ही केवळ अफवा आहे. काँग्रेस फुटणार नाही असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. विरोधी पक्ष नेते पद आमदारांच्या संख्याबळावर ठरणार आहे. ज्या पक्षाचे आमदार अधिक, त्याच पक्षाला विरोधी नेते पद मिळेल, काँग्रेस पक्षाला विरोधी पक्ष नेते पद मिळाले तर पक्षाचे ज्येष्ठ नेते हे पद कोणाला द्यायचे हे ठरवतील, असेही ते म्हणाले.