लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: नागपूर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीकडून आमदार विकास ठाकरे यांच्या नावावर मंगळवारी झालेल्या काँग्रेसच्या स्थानिक बैठकीत एकमत झाले. नावाची अतिंम घोषणा श्रैष्ठीकडून होणार आहे.

महाविकास आघाडीत नागपूरची जागा काँग्रेसकडे आहे परंतु आचारसंहिता लागल्यावरही पक्षाकडून उमेदवार निश्चित झाला नाही. उलट भाजपकडून नितीन गडकरींची उमेदवारी जाहीर झाली आहे. कार्यकर्ते प्रचाराला लागले आहे. दुसरीकडे स्थानिक काँग्रेस नेत्यांची मंगळवारी बैठक झाली. त्यात माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, डॉ. सतीश चतुर्वेदी, आमदार अभिजित वंजारी, आमदार विकास ठाकरे यांच्यासह इतरही काँग्रेस नेते व पदाधिकारी हजर होते. यावेळी विकास ठाकरे यांच्या नावावर एकमत झाले. हा निर्णय पक्षश्रेष्ठींना कळवण्यात येणार आहे.

आणखी वाचा- “उद्धव ठाकरे यांची ताकद किती, हे भाजपला आता कळले,” वरुण सरदेसाई असे का म्हणाले? वाचा…

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना विलास मुत्तेमवार म्हणाले, आज काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. त्यात नागपूरसाठी एका नावावर एकमत झाले. हे नाव पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात येईल. दरम्यान आ विकास ठाकरे यांनीही बैठकीत वरिष्ठांनी घेतलेला निर्णय आम्ही मान्य करु, असे सांगितले. ठाकरेंचे नाव निश्चित झाले तर नागपुरात नितीन गडकरी विरूद्ध विकास ठाकरे अशी लढत होण्याची शक्यता आहे.

दरम्यान काँग्रेसच्या बैठकीत माजी मंत्री सुनील केदार गैरहजर होते. केदार गटाकडून प्रफुल्ल गुडधे यांचे नाव पुढे करण्यात आले होते. हे येथे उल्लेखनीय. त्यामुळे ठाकरेंच्या नावाला केदार गटाकडून विरोध होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा- भंडारा गोंदियात कमळ फुलणार की ‘टिकटिक’ वाजणार? तिढा कायम, इच्छुकांची कोंडी

डॉ. संजीव चौधरी यांना विचारणा

नागपुरातील सुप्रसिद्ध अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. संजीव चौधरी यांनी नागपुरातून महाविकास आघाडीकडून लढावे यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून त्यांना विचारणा करण्यात आली होती. पण त्यांनी नकार कळवला, आपला राजकारणाशी संबंध नाही व भाजप नेते नितीन गडकरी यांच्याशी कौटुंबिक संबंध आहे, हे कारण चौधरी यांनी दिल्याचे सुत्रांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla vikas thackeray from maha vikas aghadi for nagpur lok sabha constituency mnb 82 mrj
Show comments