लोकसत्‍ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने निर्लज्जपणाचा कळस गाठला असून धर्माच्या आधारे राजकारण करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू असताना आता शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनाही वेठीस धरण्याचा प्रयत्न चालवला आहे. या सरकारने चक्क शाळा महाविद्यालयांमध्ये प्रचार सुरू केला आहे, असा आरोप काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

राज्य सरकारच्या वतीने राज्यभरात आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध माध्यमातून प्रचाराचा धडाका सुरू आहे. राज्यातील जनता महागाई आणि गरिबीच्या खाईत ढकलली गेली असताना, सरकार मात्र उत्सवी राजकारणाची गोळी जनतेला देत आहे. वर्षांनुवर्ष चालत आलेल्या सण परंपरांना ‘इव्हेंट’चे स्वरूप देऊन लोकांचे लक्ष मूळ प्रश्नांवरून बाजूला हटवण्याचा प्रकार राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने सुरू आहे. सध्या धार्मिक वातावरण निर्माण करून जनतेचे लक्ष महागाई आणि बेकारी यासारख्या प्रश्नांवरून वळवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. आता शाळेतील विद्यार्थी आणि महाविद्यालयीन तरुणांना प्रचाराचा भाग बनवले जात आहे, असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.

आणखी वाचा-धक्कादायक! वास्तुशांतीसाठी भूमी अभिलेख कार्यालयात चक्क होम हवन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. त्यानिमित्ताने आपल्या पक्षाचा अजेंडा राबवत प्रचार करतात त्यांचाच कित्ता आता राज्यातील शिंदे फडणवीस पवार यांच्या सरकारने गिरवायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन तरुणांसाठी राज्य सरकार कोणकोणत्या योजना राबवत आहे आणि कशाप्रकारे विद्यार्थ्यांसाठी काम करीत आहे. याचे दोन पानी पत्र शाळा महाविद्यालयांमध्ये वितरित केले जात आहे. विशेष म्हणजे काही शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असताना शिक्षकांनी आणि प्राध्यापकांनी मुख्यमंत्र्यांचे हे पत्र विद्यार्थ्यांना वितरित केले आहे. स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही प्रचाराचे साधन बनवून राज्य सरकारने निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. सरकारला जर काय करायचे असेल, तर सरकारने आधी दर्जेदार शिक्षण दर्जेदार सुविधा आणि तरुणांच्या हाताला काम द्यावे. केवळ पत्रकबाजी करून प्रचार करू नये, असेही यशोमती ठाकूर यांचे म्‍हणणे आहे.