लोकसत्‍ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती: राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेलोरा विमानतळासाठी भरीव निधी दिल्याचे सांगितले, पण हा निधी किती असेल हे तेव्हा सांगितले नव्हते. काल आलेल्या शासन निर्णयावरून कळले की, अमरावती विमानतळासाठी फक्त ५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. खरे तर बेलोरा विमानतळासाठी १२२.७० कोटी रुपयांची आमची मागणी होती आणि त्या मागणीला प्रशासकीय मान्यता सुद्धा मिळाली होती. पण कालच्या शासन निर्णयानुसार फक्त ५ कोटी रुपये मंजूर करुन अमरावती विभागातील नागरिकांचा अपेक्षाभंग केला आहे. हा अमरावतीकरांसाठी दुजाभावच आहे, अशी टीका काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

बेलोरा विमानतळासाठी केवळ ५ कोटी रुपये मंजूर झाल्‍याचा शासन निर्णय आपण वाचला, तेव्‍हा आपल्‍याला मोठा धक्‍का बसला. महाविकास आघाडी सरकारच्‍या काळात बेलोरा विमानळाच्‍या विस्‍तारीकरणाच्‍या कामासाठी भरघोस निधी उपलब्‍ध करून देण्‍यात आला होता. डिसेंबर २०२२ मध्‍ये रात्रकालीन उड्डाणसुविधेसह विमानसेवा सुरू होणे अपेक्षित होते. पण, मार्च महिना संपूनही विमानसेवा केव्‍हा सुरू होणार, याचे उत्‍तर कुणाकडे नाही. विमानतळासाठी भरघोस निधी मंजूर झाल्‍याचे सांगण्‍यात आले. त्‍याचा गवगवा करण्‍यात आला. पण, प्रत्‍यक्षात विमानळाच्‍या टर्मिनल इमारतीच्‍या बांधकामासाठी यंदाच्‍या अर्थसंकल्‍पात केवळ ५ कोटी रुपये देण्‍यात आले आहेत. यातून या सरकरला अमरावतीविषयी किती आत्मियता आहे, हे दिसून येते. हा दुजाभाव आता किती दिवस सहन करणार, असा सवाल यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

आणखी वाचा- हरिभाऊ राठोड केसीआर यांच्या ‘बीआरएस’मध्ये; ‘या’ तीन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार

एकीकडे, धर्माच्‍या नावावर राजकारण सुरू आहे. ‘हनुमान चालिसा’च्‍या नावाखाली लोकांची दिशाभूल करण्‍याचे काम करण्‍यात येत आहे. राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ‘मनी नाही भाव, म्‍हणे देवा मले पाव,’ असे भजनात सांगून दांभिकतेवर प्रहार केला होता. अमरावती विभागाप्रती सरकारच्‍या काय भावना आहेत, हेच यातून दिसून आले आहे, अशी टीका करून यशोमती ठाकूर यांनी शासन निर्णयाचा निषेध केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla yashomati thakur criticizes devendra fadnavis about belora airport funding mma 73 mrj
Show comments