लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमरावती : महाविकास आघाडीत मुख्‍यमंत्रीपदाच्‍या चेहऱ्यावरून वादाची ठिणगी काही दिवसांपुर्वी पडली. त्‍यानंतर स्‍वत: माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदावरून महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. प्रथम सत्ताधारी महायुतीने आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा, त्यानंतर महाविकास आघाडी आपला चेहरा जाहीर करेल, असे स्‍पष्‍टीकरण दिले. तरीही मुख्‍यमंत्रीपदाची चर्चा सुरूच आहे. त्‍यातच आता काँग्रेसच्‍या आमदार यशोमती ठाकूर यांनी उद्धव ठाकरे हेच मुख्‍यमंत्री व्‍हावेत, असे विधान केल्‍याने त्याची चर्चा सुरू झाली आहे.

येथील संत ज्ञानेश्‍वर सभागृहात रविवारी रात्री महाविकास युवा आघाडीच्‍या मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. या मेळाव्‍याला काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे, आमदार यशोमती ठाकूर तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्‍ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्‍या युवा आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. उद्धव ठाकरे मुख्‍यमंत्री व्‍हावेत, हे आपले वैयक्तिक मत असल्‍याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितले असले, तरी त्‍यांच्‍या वक्‍तव्‍याची चर्चा रंगली आहे.

आणखी वाचा-नागपुरातील गुंडांच्या टोळ्यामध्ये पिस्तूलांचा सर्रास वापर, पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय

यशोमती ठाकूर म्‍हणाल्‍या, मी मुख्‍यमंत्री व्‍हावे, असे कुणीतरी म्‍हणाले, पण माझ्या मनात एक खंत आहे ही उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्‍ये ५ वर्षे पूर्ण करायचे होते. त्‍यामुळे आता त्यांनीच मुख्‍यमंत्री व्‍हावे, असे माझे वैयक्तिक मत आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी बोट धरून राजकारणात आणले, पद, मानसन्‍मान आणि आर्थिक बळ दिले. त्‍यांना उद्धव ठाकरे यांचे मुख्‍यमंत्रीपद डोळ्यात खुपले. उद्धव ठाकरे यांची रुग्‍णालयात शस्‍त्रक्रिया होत असताना बाळासाहेबांना बाप म्‍हणणाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्‍या पाठीत खंजीर खुपसला. ज्यांच्यावर विश्‍वास ठेवला, त्‍यांनीच विश्‍वासघात केला. त्‍यामुळे अशा लोकांवर विश्‍वास ठेवू नका.

आणखी वाचा-विमानाचे डावे पंख तुटले; तब्बल २५ कोटींच्या नुकसान भरपाईचा…

यशोमती ठाकूर म्‍हणाल्‍या, ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही. महाविकास आघाडीत जे काही किंतू, परंतु असतील, ते एकत्र बसून तेथेच मिटवून घ्‍या. बुथ सांभाळा. मतदान केंद्र आणि मतदान यंत्रांवर लक्ष ठेवा. नुकत्‍याच झालेल्‍या लोकसभा निवडणुकीत २ लाख मतांच्‍या फरकाने आमच्‍या उमेदवाराचा विजय होईल, याची निश्चिती वाटत होती, पण गद्दारी कुणी केली, पैसा किती खर्च केला, हे सांगण्‍याची गरज नाही. म्‍हणूनच गावागावातून मतदान बाहेर काढावे लागणार आहे. येत्‍या २४ ऑक्‍टोबरला मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. संपूर्ण तिवसा मतदारसंघ माझे कुटुंब आहे. युवकांनी या निवडणुकीत गाफील राहता कामा नये.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla yashomati thakur says uddhav thackeray should be the chief minister mma 73 mrj