अकोला : जिल्ह्यातील तुलंगा खुर्द येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे बॅनर फाटलेल्या अवस्थेत आढळून आले. त्याच्या निषेधार्थ मनसैनिकांनी अकोला – पिंपळखुटा बसची तोडफोड केली. या प्रकरणी बसचालकाच्या तक्रारीवरून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चान्नी पोलिसांनी पाच आरोपींना गजाआड केले आहे. दरम्यान, मनसैनिकांच्या आक्रमक कृती विरोधात प्रवाशांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. बस तोडफोड करून गोंधळ काय घालता? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊन उपोषण करा, असा सल्ला एका प्रवाशाने दिला. या घटनेचे चित्रफीत समाज माध्यमातून चांगलीच प्रसारित झाली आहे.
जिल्ह्याच्या पातूर तालुक्यातील तुलंगा खुर्द येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेची स्थापना करण्यात आली आहे. या शाखेचे फलक गावात प्रमुख ठिकाणी लावण्यात आले. दोन दिवसांपूर्वी ते फलक फाटलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यामुळे मनसैनिकांमध्ये रोषाची भावना निर्माण झाली.मनसैनिकांनी आक्रमक होत बुधवारी पिंपळखुटा येथून अकोलाकडे (क्र. एमएच ०७ सी ९१०७) निघालेल्या बसला लक्ष्य केले. तुलंगा खुर्द येथे बस थांबली असताना अचानक पाच पुरुष व दोन महिला बसजवळ आले. त्यापैकी तिघांच्या हातात काठ्या होत्या. त्यांनी काठीने बसच्या दर्शनी भागाच्या काचेची तोडफोड केली. त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता तिघांनी चालक संतोष राऊत व वाहक अश्विन पाटील यांना धक्काबुक्की केली.
त्यानंतर बस चालक संतोष डिगांबर राऊत यांनी बस चान्नी पोलीस ठाण्यात आणली व बसची तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी राजेश बोरकर, सोपान बुंदे, दोन्ही रा. सावरगांव, तसेच विकास शेवलेकर, गोविंदा शेवलेकर, विलास शेवलेकर, आरती शेवलेकर, निर्मला शेवलेकर सर्व रा. तुलंगा खुर्द यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पाच पुरुष आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला.
या घटनेच्या वेळी बसमधून तब्बल ८२ प्रवासी अकोल्याकडे निघाले होते. मनसैनिकांनी अचानक आक्रमक भूमिका घेत बसची तोडफोड केल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी मनसैनिकांना खडेबोल सुनावले. याप्रकारे बसची तोडफोड करून गोंधळ घालण्याऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊन उपोषण करा, असा सल्ला प्रवाशांनी दिला. त्यावर मनसैनिकांनी कोणी ऐकत नसल्याचे उत्तर दिले.