अकोला : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने मला मारून टाकण्याचे नियोजन होते. या हल्ल्याचे ‘मास्टर माइंड’ राज ठाकरेच आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.
अजित पवार पुण्यात नसतानाही येथील धरणे भरल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्या टीकेला मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले. राज ठाकरे ‘सुपारीबहाद्दर’ असल्याची टीका त्यांनी केली होती. टोल आणि भोंग्याचे आंदोलन फसलेल्या ‘सुपारीबहाद्दरां’नी अजित पवारांवर बोलू नये. कुठल्याही आंदोलनाला ते यशस्वी करू शकले नाहीत. राज ठाकरेंची विश्वासार्हता संपली आहे, असा टोला आमदार मिटकरी यांनी लगावला होता. या टीकेमुळे मनसैनिक चांगलेच आक्रमक झाले. यातून अकोल्यात मिटकरी यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली.
हेही वाचा…“राज ठाकरेच माझ्यावरील हल्ल्याचे मास्टरमाईंड,” अमोल मिटकरींचा आरोप; “त्यांनी मला मारून…”
यावेळी आमदार मिटकरी एका बैठकीसाठी शासकीय विश्रामगृहात उपस्थित होते. त्यांनाही जाब विचारण्याचा प्रयत्न मनसैनिकांनी केला. राष्ट्रवादी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली. मात्र, पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना रोखल्यामुळे मोठा संघर्ष टळला. घटनेनंतर मनसैनिक घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्याच्या कारणावरून आमदार अमोल मिटकरी यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.
दरम्यान, या सर्व प्रकरणावरून आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा तोफ डागली असून राज ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मनसैनिक झुंडीने हल्ला करण्यासाठी आले होते. मनसेचे पक्ष निरीक्षक कर्णबाळा दुनबळे यांनी अमोल मिटकरी यांना संपवून टाकण्याचे राज ठाकरे यांचे आदेश असल्याचे कार्यकर्त्यांना सांगितले होते, असा दावा आमदार मिटकरी यांनी केला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन विनंती करणार आहे.
हेही वाचा…मध्य रेल्वेच्या ‘मेगा ब्लॉक’मुळे प्रवाशांना मनस्ताप; तब्बल ११ गाड्यांच्या फेऱ्या रद्द
राज ठाकरे यांनी असे आदेश दिले होते का?, याची दखल घेतल्या जाणार की नाही. एखाद्या पक्षाचा प्रमुख सत्ताधारी आमदारांना कुटुंबासह संपवून टाका, असे आदेश देतो, तो निरोप घेऊन आलेल्या पक्ष निरीक्षकासमोर हल्ला होतो, त्याच्या मुळाशी गेले पाहिजे. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली. या संदर्भात मुख्यमंत्री, गृहमंत्री यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हल्ला करणाऱ्यांनी शिवतीर्थावरील आदेशाने करीत असल्याचे सांगत पुरावा सोडला. एकीकडे महाराजांचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे जीवाने मारण्याचे आदेश द्यायचे. या हल्ल्याचे ‘मास्टर माइंड’ राज ठाकरे असल्याचा गंभीर आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला.
हेही वाचा…वर्धेतील हिंदी विद्यापीठ पुन्हा वादात! कुलसचिवांनी राजीनामा देताच कुलगुरूंनी केले असे काही की…
हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल
आमदार अमोल मिटकरी यांच्या वाहनावर हल्ला केल्याप्रकरणी मनसेच्या आठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून कारवाईला दिरंगाई होत असल्याने आमदार अमोल मिटकरी यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.