नागपूर : भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत मध्यरात्री मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली तर दुसरीकडे नागपूरमध्ये भाजपाने मनसेला खिंडार पाडत या पक्षाच्या नेत्यांना पक्षात प्रवेश दिला.
दोनच दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत राज ठाकरे यांची भेट घेतली. यात राजकीय चर्चा झाली नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी फडणवीस यांच्या नागपुरात भाजपाकडून मनसेला खिंडार पाडले जात होते. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे नागपूर जिल्हा अध्यक्ष दिनेश ईलमे, उत्तर नागपूर शाखेचे अध्यक्ष महेश माने यांच्यासह मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
गोधनी रोडवरील गोविंद लॉन येथे भाजपा कार्यकारिणी बैठकीच्या वेळी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नागपूरचे प्रभारी चैनसुख संचेती, शहर अध्यक्ष प्रवीण दटके, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, उत्तर नागपूर अध्यक्ष संजय चौधरी, प्रभाकर येवले, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला.
यापूर्वी मनसेला शिवसेनेच्या शिंदे गटाने खिंडार पाडले होते. आता भाजपामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे.