महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नागपूरसाठी मनसेची कार्यकारिणी स्थापन केली आहे. दरम्यान केलेल्या भाषणातून राज ठाकरेंनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. मनसेचे पोट्टे विरोधकांवर वरवंटा फिरवणार, असंही राज ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी काही पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे दिली.
या कार्यक्रमानंतर राज ठाकरेंनी विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीवेळी मनसे आमदार राजू पाटील, मनसे नेते संदीप देशपांडे आणि अजित अभ्यंकर आदी नेते उपस्थित होते. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या झालेल्या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या बैठकीनंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा- “लाज नसलेल्या माणसाला…”, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना आव्हाडांचा टोला
‘एबीपी माझा’ला प्रतिक्रिया देताना राजू पाटील म्हणाले की, “मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज नागपुरात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी भेट दिली. यानंतर त्यांनी मुख्यनमंत्री एकनाथ शिंदेंची सदिच्छा भेट घेतली.”
हेही वाचा- राज ठाकरेंनी नागपुरात मुख्यमंत्र्यांची घेतली भेट; बंद दाराआड झालेल्या बैठकीमुळे चर्चांना उधाण
बंद दाराआड झालेल्या चर्चेबाबत विचारलं असता राजू पाटील म्हणाले, “दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड काय चर्चा झाली? हे आम्ही कसं काय सांगू शकतो.” आगामी काळात दोन्ही पक्ष एकत्र येतील का? असा प्रश्न विचारला असता राजू पाटील म्हणाले, “सध्यातरी असंच चित्र दिसतंय. हे सरकार चांगलं काम करतंय. सांगितलेल्या सूचना ऐकून घेतल्या जातात,” अशी प्रतिक्रिया राजू पाटलांनी दिला.