कोणत्याही पदावर असलात तरी दुसऱ्याला कधी तुच्छ लेखू नका. यातून हातात काही लागणार नाही, पण तुमचीच बर्बादी होईल असा सल्ला राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला आहे. राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते पक्षातील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रं देण्यात आली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजपा, शिवसेनेचा प्रवास सांगत खचू नका असं सांगितलं.

“कोणत्याही पदावर असलात तरी दुसऱ्याला कधी तुच्छ लेखू नका. यातून हातात काही लागणार नाही, पण तुमचीच बर्बादी होईल. आज तुमच्याकडे फक्त पद आहे. दुसरी माणसं नव्हती म्हणून तुम्हाला पद दिलं असं नाही. तुम्हाला निवडून हे पद देण्यात आलं आहे. त्या पदाची जबाबदारी ओळखा. कधी कोणाला तुच्छ लेखू नका,” असा सल्ला राज ठाकरेंनी दिला.

खिल्ली उडवणाऱ्यांना इशारा

“गेल्यावेळी मी दौऱ्यावर आलो, तेव्हा मनसेला पदाधिकारी मिळत नाही, अशा बातम्या आल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात अंजन घालावं यासाठी पदाधिकाऱ्यांना आज पत्रवाटप करण्यात आले आहे. काही पत्रकार एखाद्या पक्षासाठी वाहलेले असतात. काही जणांनी इतके वर्ष पक्षांची दलाली केली असेल, तर त्यांना दुसरा पक्ष वाढत असताना त्रास होणारच आहे. मात्र, नागपूरमधील काही पत्रकार मनसेला प्रोत्साहन देत आहेत”, असं राज ठाकरे म्हणाले.

“एखाद्या पक्षाचा विजय आणि पराभव होत राहतो. आधी विदर्भ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यानंतर तो भाजपाचा बालेकिल्ला झाला. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष यातून गेला आहे. आज आमच्या शाखाध्यक्षांना बघून लोकं म्हणतील ‘हे पोट्टं काय करणार? मात्र, काही दिवसांनी हे पोट्टं तुमच्यावर वरवंटा फिरवेल”, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.