मनसे अध्यक्ष राज ठाकरे सद्या विदर्भ दौऱ्यावर असून रविवारी सकाळी ट्रेनने नागपुरात दाखल झाले. यावेळी नागपूर रेल्वे स्थानकावर त्यांचं समर्थक आणि कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं. राज ठाकरेंचं स्वागत करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. दरम्यान पक्षबांधणीसाठी पोहोचलेल्या राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत कानमंत्र दिला आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या सक्रीय झाले आहेत.
नागपूरमध्ये राज ठाकरेंकडून कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसमवेत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत राज ठाकरेंनी बदल निसर्गाचा नियम आहे, तो निश्चित होईल असा विश्वास व्यक्त करताना कार्यकर्त्यांना पक्षबांधणी, तळागळात पक्ष मजबूत करा असा सल्ला दिला.
राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर; बैठका, चर्चा अन् बरंच काही; ‘असं’ असेल मनसेचं ‘मिशन विदर्भ’
नागपूर दक्षिण विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत राज ठाकरेंची पहिली बैठक पार पडली. यावेळी राज ठाकरेंनी त्यांना काही सूचना केल्या. राज ठाकरेंनी नागपुरात आपली इतकी ताकद नाही, त्यामुळे चांगलं यश मिळवण्यासाठी पक्षबांधणी करणं गरजेचं असल्याचं सांगितलं. मी आलो असून, येत राहीन, पण तुम्हाला मेहनत घेत पक्षबांधणी करावी लागेल असा सल्ला राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला.
पक्षाचं नवनिर्माण आम्ही करु, स्थानिक पातळीवर तुम्हाला पक्ष बांधावा लागेल असं ते म्हणाले. पक्षात आलेली मरगळ दूर करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल अशी सूचनाही यावेळी राज ठाकरेंनी केली. पक्षात नवीन ऊर्जा आणण्याचं काम करु असं सांगताना राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांचंही म्हणणं ऐकून घेतलं.