नागपूर सुधार प्रन्यासच्या एका कर्मचाऱ्यावर गैरव्यवहाराचे आरोप करून त्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज नासुप्रच्या सिव्हिल लाईन्स येथील कार्यालयावर धडक दिली. सदर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. मनसेने चार महिन्यांपूर्वी नासुप्रच्या एका कर्मचाऱ्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप करत निलंबित करण्याची मागणी केली होती. त्यावेळी प्रशासनाने कारवाईचे आश्वासन दिले होते. परंतु, गेल्या चार महिन्यांपासून काहीच कारवाई झाली नाही, असा आरोप करीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात शिरण्याच्या प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली.
हेही वाचा >>> भंडारा: धक्कादायक! दबक्या पावलांनी बिबट थेट घरात शिरला अन्…
येथे थोडावेळ गोंधळाची स्थिती होती. पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, मनसेचे शहर सचिव विशाल बडगे म्हणाले, चार महिन्यांपूर्वी नासुप्रच्या सभापतींनी चव्हाण नावाच्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, अद्याप कारवाई झाली नाही. शिवाय मनसेच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्याची वेळ देण्याचे टाळत होते. त्यामुळे आजचे आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात नासुप्रचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी म्हणाले, संबंधित कर्मचाऱ्याला त्याच्या मुख्य कार्यापासून दूर करून कमी महत्त्वाचे काम देण्यात आले आहे. तसेच चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली असून समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर त्याच्याविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल.