बुलढाणा : खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव येथे मंगळवारी सशस्त्र दरोड्याप्रकरणी ‘काँबिंग ऑपरेशन’ राबवणाऱ्या पोलीस पथकावर जमावाने हल्ला केल्याची खळबळजनक घटना फत्तेपूर (ता. खामगाव) येथे आज शुक्रवारी उत्तररात्री घडली. यामुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली असून किमान २५ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पोलीस पथक फत्तेपूर घाटातील पारधी वस्तीवर रात्री ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवत असताना, तेथील नागरिकांनी पोलिसांना मनाई करून लोटपाट व मारहाण केली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणि मारहाण करणाऱ्या जवळपास २५ जणांवर हिवरखेड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी जखमी युवराज राठोड यांनी हिवरखेड पोलिसात तक्रार दिली. यावरून राजू भोसले, विजू भोसले, लहू धंदरे, तीन महिला यांच्यासह १५ ते २० आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
हेही वाचा – यवतमाळ : ५०० रुपयांच्या ९६४ बनावट नोटा जप्त
खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव नजीकच्या शेतात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या घरी आठ ते दहाजणांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना मंगळवारी रात्री घडली होती. चोरट्यांनी लाठ्या, लोखंडी पाईप आणि चाकूने वार केल्याने महिलांसह चौघेजण जखमी झाले. लाखाचा ऐवज घेऊन अज्ञात आरोपी पसार झाले होते. या घटनेतील आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथकाने फत्तेपूर गावातील पारधी तांड्यावर कोंबिंग ऑपरेशन करण्याचे ठरवले आणि रात्रीच्या वेळेस हे ऑपरेशन सुरू केले. मात्र तांड्यावरील नागरिकांनी चार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाठ्याकाठ्या आणि दगडांनी मारा करीत पळून जाण्यास भाग पाडले.