भंडारा : गावातील एका मुलीवर जादूटोणा केल्याच्या संशयावरून ४० जणांच्या जमावाने एका इसमाला बेदम मारहाण करून गावातील समाज मंदिरात डांबून ठेवण्याची धक्कादायक घटना सोमवारी दि. १७ फेब्रुवारी रोजी रात्री ८.४५ वाजता चिचखेडा जुना येथे घडली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यामुळे अनर्थ टळला. या प्रकरणी ४० जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
पवनी तालुक्यातील चिचखेडा (जुना गाव) येथील मारोती अर्जुन चंदनबावणे, वय ३४ हा रात्रीच्या सुमारास पत्नी व मुलीसह घरी जेवण करीत होता. त्याच वेळी चारचाकी व दुचाकीवरून लोकांचा घोळका त्याच्या घरावरच्या दिशेने आला. हातात काठ्या आणि आक्रमक पवित्रा घेतलेले ४० च्या घरात लोक मारोतीच्या घरी घुसले आणि बळजबरीने त्याला घराबाहेर ओढत आणले. मारोतीने अतुल हरी जांभुळे याच्या मुलीवर जादूटोणा केल्याचा आरोप करीत जमावाने त्याला शिवीगाळ केली व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नव्हे, तर जमावाने मारोतीला बळजबरीने चिचखेडा पुनर्वसन येथील समाजमंदिरात नेत बंद करून डांबून ठेवले.
घटनेची माहिती मिळताच पवनी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी गाठले आणि जमावाच्या तावडीतून मारोतीची सुटका केली. पोलीस मारोती चंदनबावणे व शालीकराम गोविंदा रामटेके (७४, रा. चिचखेडा) यांना पोलीस स्टेशनला आणत असताना जमावाने गाडी अडवून शासकीय कामात अडथळा आणला. त्यामुळे ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अतुल हरी जांभुळे (४०), अंकोश श्रीरामे (५०), अविनाश बगडे (२६), प्रशांत बगडे (४०), दत्तु बगडे (४०), शुमम श्रीरामे (२६), विनीत मेश्राम (४०), शशिकपूर गोन्नाडे (५५), दीपक तलमले (४०), रामदास शहारे (३०), प्रविण उके (४०), मच्छिद्र श्रीरामे (४०), रमेश जांभुळे (४०), गुड्डू जांभुळे (३५), ज्ञानेश्वर जांभुळे (५०), अंताराम तलमले (२२), नितीन वाघमारे (२७), नरेश कुंभारे (४५), चेतन गोन्नाडे (२७), ईश्वर गजभिये (२५), बाला रामटेके (२६), विक्की बगडे (३५), विष्णु गोन्नाडे (२३), वैभव सलामे (२५), योगेश श्रीरामे (२२), अश्विन सके (३०), निलेश सलामे (२७), अंकीत वहाणे (२३), अभय श्रीरामे (२३), लखन बगडे (२३), अविनाश तलमले (२७), अश्मिता जांभुळे (३०), कुंदा श्रीरामे (३०), वंदना श्रीरामे (३८), मेघा जांभुळे (२९), संगीता श्रीरामे (३०), निलीमा वाघमारे (२९), वृंदा सलामे (३०), लिलाबाई सलामे (५५) आणि प्रशिक बगडे (२६) यांच्यावर पवनी पोलिसांनी विविध कलम अन्वये महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम तसेच १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला नसता, तर जमावाकडून अनुचित घटना घडण्याची शक्यता होती, असे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राहाटे करीत आहेत.