नागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी गणिताच्या परीक्षेदरम्यान पुन्हा नवा गोंधळ समोर आला आहे. खामला येथील ज्युपिटर विद्यालयातातील एका दहावीच्या विद्यार्थ्याने चक्क अंतर्वस्त्रात भ्रमनध्वनी लपवून आणला होता. भरारी पथकाच्या तपासादरम्यान ही बाब उघडकीस आली. गणिताच्या पेपरला तीन कॉपीची प्रकरणेही पकडण्यात आली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुधवारी दहावी गणिताचा पेपर असल्याने राज्य मंडळाच्या भरारी पथकांनी अनेक परीक्षा केंद्रांना भेटी दिली. महसूल विभागाच्या नियंत्रणातील भरारी पथकाने सावरकरनगर, खामला येथील ज्युपिटर विद्यालयात पाेहचून तपासणी केली असता एका विद्यार्थ्याजवळ चक्क भ्रमनध्वनी आढळून आला. या विद्यार्थ्याने त्याच्या अंतर्वस्त्रात भ्रमनध्वनी ठेवला हाेता. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची नाेंद करीत पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान गणिताच्या पेपरला या घटनेसह ३ काॅपीबहाद्दरांना पकडण्यात आले. यामध्ये गडचिराेलीच्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांचा समावेश आहे.

दहावीत ७, बारावीत ३० काॅपीची प्रकरणे

दरम्यान दहावीच्या परीक्षेत आतापर्यंत काॅपीची ७ प्रकरणे नाेंदविण्यात आली आहे. इंग्रजीच्या पेपरच्या दिवशी ४ विद्यार्थ्यांना पकडले हाेते. दुसरीकडे बारावीच्या परीक्षेतील काॅपी बहाद्दरांचा आकडा ३० वर गेला आहे. या प्रकरणात आतापर्यंत ४ पर्यवेक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. त्यातील वर्धेच्या प्रकरणात शिक्षणाधिकाऱ्यांकडून संबंधित विद्यालयात पत्र गेल्यानंतर त्यावर उत्तर मिळाले नसल्याची माहिती शिक्षण मंडळाने दिली.

माेबाईल काॅपीसाठी की वेगळ्याच कारणासाठी

नागपुरातील ज्या विद्यार्थ्याजवळ माेबाईल सापडला, त्याच्याबाबत वेगळीच बाब समाेर येत आहे. हा विद्यार्थी मजुराचा मुलगा आहे. त्यामुळे मुलाला केंद्रावर साेडून कामावर निघून गेलेल्या वडिलांनी पेपर संपल्यावर घ्यायला येण्यासाठी संपर्क करशील, असे सांगून त्याच्याजवळ माेबाईल ठेवला हाेता. ताे माेबाईल त्याने केंद्र प्रमुख किंवा पर्यवेक्षकाजवळ देण्याऐवजी आपल्याजवळ ठेवला हाेता, अशी माहिती बाेर्डाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्याने हा माेबाईल काॅपी किंवा प्रश्नपत्रिका व्हायरल करण्यासाठी वापरला नाही, असेही सांगण्यात येत आहे. मात्र माेबाईल त्याने अंतवस्त्रात का ठेवला, हा प्रश्न आहे. तरीही परीक्षेमध्ये इलेक्ट्रानिक्स उपकरण बाळगणे गुन्हा असल्याने हे प्रकरण नाेंदविले असल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.