नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना मोबाईल, गांजा पुरविणाऱ्या टोळ्या कार्यरत असून त्यामध्ये कारागृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे पुढे आले होते. आता पुन्हा एकदा मोबाईल सापडल्याची घटना समोर आली आहे. न्यायालयीन पेशीवरून आलेल्या आरोपीकडे अंगझडतीदरम्यान मोबाईल, बॅटरी आणि एम-सीलचे दोन पाकिट आढळून आले. शनिवारी सकाळी मध्यवर्ती कारागृहात हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी आणि दरोड्याच्या प्रकरणात मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त प्रणय बोरसे (३४) याला गुजरातच्या न्यायालयात पेशीसाठी नेले होते. शनिवारी सकाळी नागपुरात आल्यानंतर कारागृह कर्मचाऱ्यांनी अंगझडती घेतली असता त्याच्या अंतर्वस्त्रात मोबाईल, बॅटरी आणि एम-सील मिळाले. यापूर्वी कारागृहात सप्टेंबर २०२२ आणि त्यापूर्वीसुद्धा मोठ्या प्रमाणावर मोबाईल, बॅटरी व इतर साहित्य मिळून आले होते. शहर पोलिसांचे विशेष पथक, कारागृहातील पथक आणि पुण्याच्या पथकाने कारागृहातील बरॅकची झाडाझडती घेतली. प्रणयवर मालेगावात खंडणी आणि दरोड्याचे गुन्हे आहेत. याशिवाय गुजरातमध्येही गुन्ह्याची नोंद आहे. कारागृह प्रशासनाने धंतोली पोलिसांना माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. प्रणय बोरसेला मोबाईल कोणी दिला? तो कोणाला फोन करणार होता. शिवाय एमसीलचा उपयोग कशासाठी करणार होता, हे सर्व प्रश्न अनुत्तरित आहेत.