देवेश गोंडाणे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : देशात महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. केंद्रातील ३२ लाख सरकारी पदे रिक्त असतानाही मोदी सरकार नोकर भरती करत नाही. अशा महत्त्वाच्या मुद्दयांकडे दुर्लक्ष करून मोदी सरकार आगामी निवडणुका डोळयासमोर ठेवून राम मंदिराच्या विषयाला महत्त्व देत आहे. मंदिराचे भजन घेऊनच भाजप सरकार निवडणुकांना पुढे जाईल. परंतु, या आमिषाला बळी  नका, असे आवाहन काँग्रेसचे  अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केले. खरगे यांनी मराठीतून भाषण केले. काँग्रेसच्या १३९व्या स्थापनादिनी नागपूरच्या ‘भारत जोडो’ मैदानावर सभा झाली.

खरगे म्हणाले की, नागपूरमध्ये एका बाजूला दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आहे. तर याच नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जन्मस्थळही आहे. पंतप्रधान मोदी हे संघाचा झेंडा घेऊन पुढे जात आहेत. संघ या देशाचे वाटोळे करू पाहत आहे. संघाचे विचार जपणाऱ्या भाजप सरकारला जर आपण रोखू शकलो नाही तर देशातील लोकशाही उद्ध्वस्त होईल. संविधानाने महिला, गरीब, मागास समाजाला अधिकार दिले ते भाजप देऊ शकत नाही असा दावा खरगे यांनी केला.

हेही वाचा >>> गरीब ही एकच जात, मग मोदी ओबीसी कसे? नागपूरमधील जाहीर सभेत काँग्रेसनेते राहुल गांधी यांचा सवाल

मोदींना जगभर फिरण्यास वेळ आहे पण अधिवेशन सुरू असताना संसदेत येण्यास वेळ नाही. संसदेत प्रश्न विचारणाऱ्या विरोधी पक्षांच्या १४६ खासदारांना निलंबित करून कायदे मंजूर करून घेतले ही लोकशाहीची थट्टा आहे. लोकशाहीला न जुमनणाऱ्या मोदी व भाजपला धडा शिकवा असे आवाहन खरगे यांनी केले. सूत्रसंचालन खासदार मुकुल वासनिक यांनी केले, तर आभार विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी मानले.

भाजपला घाबरू नका

भाजपने देशभरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. शासकीय यंत्रणांचा वापर करून कारवाई करत आहे. तीन राज्यांमधील निवडणुका आपण नुकतेच हरलो. मात्र, भाजपला घाबरू नका, २०२४ ची निवडणूक आपण लढू आणि जिंकू असेही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. तसेच काँग्रेस सत्तेत आल्यावर ‘न्याय’ योजना लागू करेल, असे आश्वासनही खरगे यांनी दिले.

हेही वाचा >>> राहुल गांधींकडून कृष्णकुमार पांडे कुटुंबीयांना २५ लाखांचा धनादेश, भारत जोडो यात्रेदरम्यान झाले होते निधन

कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

काँग्रेसच्या अधिवेशनाला कार्यकर्त्यांची  गर्दी होती. देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठया संख्येने कार्यकर्ते सभेसाठी आले होते. सोनिया गांधी आणि प्रियंका गांधींच्या अनुपस्थितीमुळे कायकर्त्यांचा काहीसा हिरमोड झाला. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. शिवकुमार पहिल्यांदाच आल्याने आकर्षणाचे केंद्र होते. तर कन्हैया कुमार आणि इम्रान प्रतापगडी यांच्या भाषणाला सर्वाधिक प्रतिसाद होता.