अकोला : केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी काढण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये रथावर ‘भारत’ऐवजी मोदी सरकार लिहिल्याचे पाहून जिल्ह्यातील रिधोरा येथील ग्रामस्थ चांगले संतापल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. ग्रामस्थांनी रथ अडवून अधिकाऱ्यांना जाब विचारला. ग्रामपंचायत परिसरात कार्यक्रम घेण्यावरही ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. यावेळी अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली होती.
केंद्र शासनाच्या योजनांची माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील विविध गावात विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात येत आहे. या अंतर्गतसोमवारी भारत संकल्प यात्रेच्या रथासह काही अधिकारी शहरापासून जवळच असलेल्या रिधोरा गावात पोहोचले. मोदी सरकार लिहिलेला रथ गावात येत असल्याचे पाहून ग्रामस्थांनी अधिकारी आणि रथाला गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच अडवले. रथावर ‘भारत’ऐवजी मोदी सरकार का लिहिले आहे? असा जाब ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना विचारला. वरिष्ठांकडून प्राप्त सूचनानुसार काम करीत असल्याची माहिती अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिली. मात्र, ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम होते. रथावर लिहिलेल्या मोदी सरकार या शब्दातून केवळ एका व्यक्तीचा व विशिष्ट पक्षाचा प्रचार होत आहे. त्यामुळे भारत सरकार असा उल्लेख हवा. भारत सरकार असे लिहिले असते तर आपण रथाला सहकार्य केले असते, असे ग्रामस्थांनी सांगितले. तातडीने रथ ग्रामपंचायतीच्या हद्दीतून बाहेर नेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. ग्रामस्थांची समजूत काढण्यासाठी तहसीलदारांनी गाव गाठले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील याची माहिती देण्यात आली. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी रिधोरा गाव गाठत ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थ आपल्या मागणीवर अडून होते. त्यामुळे अधिकाऱ्यांना माघार घ्यावी लागली.