नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यानंतर मोदींचा उत्तराधिकारी कोण या चर्चांना उधान आले आहे. खासदार संजय राऊत यांना नरेंद्र मोदी यांचा वारसदार कोण असेल? असा प्रश्न विचारण्यात आला.

यावर तो नेता बहुतेक महाराष्ट्रातील राहणार असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल असे राऊत म्हणाले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः सक्षम असून त्यांचा उत्तराधिकारी शोधण्याची काहीही गरज नाही. २०२९ मध्ये देश पुन्हा त्यांनाच पंतप्रधान म्हणून पाहण्यास इच्छुक असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.

यानंतर आता महसूल मंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०४७ पर्यंत मोदीच पंतप्रधान असतील. २०४७ पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प पंतप्रधान मोदीनी केला आहे. हा संकल्प त्यांच्याच नेतृत्वात पूर्ण केला जाईल, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांना तुम्ही मोदींचे उत्तराधिकारी राहणार आहात का? असा प्रश्न फडणवीस यांना विचारला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वडील जिवंत असताना त्यांचा उत्तराधिकारी शोधणे ही आमची परंपरा नाही. ही मुघल संस्कृती आहे. तसाही उत्तराधिकारी होण्याची आपला काहीही संबंध नाही, असेही फडणवीस म्हणाले. यावर आरएसएसचे माजी सहकार्यवाह भय्याजी जोशी यांना विचारणा केली असता त्यांनी याबद्दल मला काही माहिती नाही असे स्पष्ट सांगितले. त्यानंतर आत चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या वादात उडी घेतली आहे.

बावनकुळे नेमके काय म्हणाले?

चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेणोर ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाता की, संजय राऊत यांचे विधान ही केवळ राजकीय स्टंटबाजी आहे. ७५ वर्षे वयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारण सोडावे, असा कोणताही नियम नाही किंवा असा कुठलाही निर्णय झालेला नाही. भाजपच्या कोणत्याही अधिकृत धोरणातही असे म्हटलेले नाही. भारतीय संविधानातही असा कोणताही ठराव किंवा नियम नाही. भाजपचे नेते अटलबिहारी वाजपेयी वयाच्या ७९ वर्षांपर्यंत पंतप्रधान होते. तर मोरारजी देसाई ८३ आणि डॉ. मनमोहन सिंग तर वयाच्या ८१ वर्षांपर्यंत पंतप्रधान होते. पण मानसिक संतुलन बिघडल्याने भाजप द्वेषाची कावीळ झालेल्या राऊतांना हे आठवणार नाही.

भारतीय लोकशाहीत पंतप्रधानांनी कधी निवृत्त व्हायचे, हे संजय राऊत यांच्यासारख्या सकाळच्या भोंग्यावर ठरत नाही. तर निवडणुकीतील जनादेशावर आणि लोकांच्या आशीर्वादावर ठरते. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ या देशातील जनता ठरवते, संजय राऊत किंवा विरोधकांना तो अधिकार नाही. २०४७ पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प पंतप्रधान मोदीजींनी केला आहे. हा संकल्प त्यांच्याच नेतृत्वात पूर्ण केला जाईल, असेही बावनकुळे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दीर्घायुषी व्हावेत यात दुमत नाही. ते २०४७ मध्ये ९७ वर्षांचे होतील. त्यांनी अनेक वर्ष जगावे. परंतु, इतके वर्ष भाजप सत्तेत राहिल असे वाटत नाही. जनता भाजपला पुढे कधीच निवडून देणार नाही.-अतुल लोंढे, प्रवक्ता, काँग्रेस.