सरसंघचालकांकडून भय्याजी जोशी यांच्या वक्तव्याचे समर्थन

नागपूर : राम मंदिराची उभारणी तातडीने होण्यासाठी सरकारने वटहुकूम काढावा, या सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या वक्तव्याचे मी समर्थन करतो, अशा शब्दांत आज बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघाची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेनंतरसुद्धा वटहुकूमाच्या मागणीवर संघ ठाम असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

सेवासदन शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात सरसंघचालक पत्रकारांशी बोलत होते. वटहुकूम काढून  मंदिराची उभारणी केली पाहिजे, हे आमचे म्हणणे आम्ही सरकारला सांगितले आहे. मंदिर व्हावे ही सर्वाची इच्छा आहे. आता सरकार काय करतेय ते पाहू, असे वक्तव्य भय्याजी जोशी यांनी मंगळवारी केले होते. याबाबत  सरसंघचालकांना विचारले असता ते म्हणाले,भय्याजी जोशी यांच्या वक्तव्याशी पूर्णपणे सहमत आहे. त्यांच्या विधानात एक शब्द अधिकचा जोडत नाही आणि एक शब्द कमी देखील करीत नाही.

पंतप्रधान मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखीतमध्ये राम मंदिर उभारणीसाठी वटवहुकूम काढणार नाही. न्यायालयाच्या निर्णयानंतर काय ते बघू, असे म्हटले होते. याकडे भागवत यांचे लक्ष वेधले असता  त्यांच्या विधानावरून ते मंदिर उभारणार नाहीत असे वाटते काय, असा प्रतिसवाल भागवत यांनी केला. मंदिर तेथेच उभारण्यात येईल. आमचा रामावर भरवसा आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मोदी सरकारचे केवळ दोन महिने शिल्लक आहेत. त्यानंतर आचारसंहिता सुरु होईल, मग काय, असे विचारले असता भागवत यांनी कमी वेळात सर्वकाही होऊ शकते. वेळ बदलायला वेळ लागत नाही, असे सूचक विधानही केले.

पुन्हा सत्तेबाबत साशंकता

तत्पूर्वी सेवासदन शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना भागवत म्हणाले, शैक्षणिक धोरण बदलायला हवे यात काही शंका नाही. हे धोरण मुळापासून बदलले पाहिजे. सरकारने नवीन धोरण तयार केले असे म्हणतात, पण ते लागू करण्यासाठी सरकारकडे आता पुरेसा वेळ उरलेला नाही. सरकारचे पुढे काय होईल, त्यावर हे धोरण लागू होणे न होणे अवलंबून आहे, असे विधान करून मोदी यांची सत्ता पुन्हा येईल की नाही, याबाबत सरसंघचालकांनी साशंकता व्यक्त केली.

Story img Loader