सरसंघचालक डॉ. भागवत यांचे प्रतिपादन
गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात देशाचा विकास झाला नाही असे नाही. मात्र भारतासोबत स्वातंत्र्य मिळालेल्या जपान आणि इस्रायल या देशांप्रमाणे आपण प्रगती करु शकलो नाही. देशाचा विकास हा केवळ सरकारची जबाबदारी नाही. समाज म्हणून प्रत्येकाने विकास आणि देशरक्षणासाठी काम केले तर एक दिवस भारत विश्वगुरु बनेल, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केला.
नागपूरमधील सैनिकी शिक्षण देणाऱ्या प्रहार विद्यालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त गुरुवारी आयोजित कार्यक्रमात सरसंघचालक बोलत होते. यावेळी भागवत म्हणाले, इस्रायलवर सातत्याने हल्ले झाले. मात्र तरी देखील वाळवंटात तो देश उभा राहिला. आज इस्रायलकडे कोणाची डोळे वाकडे करुन पहायची हिंमत नाही. दुसरीकडे जपानने दुसऱ्या महायुद्धातील विध्वंसानंतर नव्याने सुरुवात केली. आज जपान प्रगत देश आहे. भारताला सुजलाम- सुफलाम् भूमी लाभली, गुणवान लोकांची येथे खाण आहे. मात्र तरी देखील आपण हवा तसा विकास करु शकलो नाही. मात्र येणारा काळ देशाच्या प्रगतीचाच असेल.
‘भारत तेरे तुकडे होंगे’ असे लोक देशातच बोलतात आणि काही लोक त्यांची बाजू उचलून धरतात. कुंभमेळ्य़ाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. मात्र देशाला जोडणाऱ्या अनेक बाबी आपल्या संस्कृतीत व परंपरेत आहेत. नवीन पिढय़ांना याची जाणीव करुन द्यायला हवी. लोक विदेशात पर्यटनाला जातात. त्यात वावगे नाही. मात्र देशातील इतिहासाची पाने सुवर्णाक्षरांनी लिहिणाऱ्या ठिकाणांना देखील नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन सरसंघचालकांनी केले. यावेळी सरसंघचालकांच्या हस्ते अमृतकण या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
भाजपच्या आरोपांनाच छेद
गेल्या सत्तर वर्षांत देशात काहीच विकास झाला नाही. याआधीच्या सत्ताधाऱ्यांनी नुसती लूटमार चालवली होती, असा आरोप ज्येष्ठ भाजपनेते सातत्याने करीत असतात. सरसंघचालक डॉ. भागवत यांनी मात्र याआधीच्या सरकारांच्या काळातही देश विकासाची प्रक्रिया सुरूच होती, असे आपल्या वक्तव्यातून ध्वनित करून एकप्रकारे भाजपच्या आरोपांनाच छेद दिला असल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू होती.
भारतात गुणवान लोकांची खाण आहे. मात्र तरी देखील आपण हवा तसा विकास करु शकलो नाही. मात्र येणारा काळ देशाच्या प्रगतीचा असेल. – सरसंघचालक