नागपूर : सरकारमध्ये काही ओळखीचे लोक आहेत. मी त्यांच्याकडे कर्णबधिर मुलांसाठी आवश्यक काॅकलिअर इम्प्लांटवर आकारण्यात येणाऱ्या जीएसटीचा मुद्दा मांडेन. परंतु ते ऐकतील का, हे सांगता येत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
स्पीकहिअर इंडिया फाउंडेशनतर्फे बुधवारी परवाना भवन येथे आयोजित श्रवणदोष जागृती कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. भागवत म्हणाले, सरकारचे एक वेगळे प्रारूप असते. त्यानुसार ते काम करतात. काॅकलिअर इम्प्लांटवर आकारण्यात येणाऱ्या जीएसटीचा मुद्दा सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम मी करेन. काॅकलिअर इम्प्लांट व कर्णयंत्रासाठी समाजानेही पुढाकार घेण्याची गरज आहे.
काॅकलिअर इप्लांटचा खर्च जास्त आहे. त्यामुळे समाजातील दानशुरांनी गरजूंच्या मदतीसाठी पुढे यावे. संघ विविध सामाजिक क्षेत्रात सतत काम करते. परंतु सर्वच क्षेत्रात काम शक्य नाही. त्यामुळे एखादी संस्था या क्षेत्रात काम करत असेल तर संघाकडून त्यांना पूर्ण मदत केली जाईल. जन्मजात मुलांमध्ये हा व्यंग राहू नये म्हणून प्रत्येक महिलांना आधीपासूनच उत्तम पोषण आहार मिळायला हवा, असेही डॉ. भागवत म्हणाले.
हेही वाचा – अंबादेवी आणि एकवीरा देवीला ३ हजार किलोचा मेव्याचा नैवैद्य
डॉ. मिलिंद कीर्तने म्हणाले, आपल्याकडे कर्णयंत्रावर जीएसटी लागत नाही. परंतु काॅकलिअर इम्प्लांट कर्णबधिर मुलांशी संबंधित आहे. त्यावर मात्र जीएसटी लागते. सोबत कर्णयंत्रातील सुट्या भागांवरही जीएसटी लागत असल्याने हे साहित्य महाग आहेत. आधीच कर्णबधिरतेशी संबंधित अनेक लोक आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतात. त्यात हे साहित्य महाग असल्याने अनेकांना ते परवडत नाही.