100 Years of Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शनिवारी ९९ वर्ष पूर्ण झाले व संघाने शताब्दी वर्षात पदार्पण केले. रेशीमबाग येथे शनिवारी विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे नागपुरात पाऊस असूनदेखील चिखल व पावसात हे आयोजन झाले. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी देशात जातीपातीच्या आधारावर निर्माण होत असलेले भेद व त्यामाध्यमातून अराजकता पसरविण्याच्या प्रयत्नांवर चिंता व्यक्त केली. या कार्यक्रमाला इस्त्रोचे माजी अध्यक्ष के. राधाकृष्णन हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

सीमाभागात विनाकारण हिंसाचार

आज देशाच्या वायव्य सीमेला लागून असलेल्या पंजाब, जम्मू-काश्मीर, लडाख; सागरी सीमाक्षेत्रातील केरळ, तामिळनाडू आणि बिहारपासून मणिपूरपर्यंत संपूर्ण पूर्वांचल अस्वस्थ आहे. देशात विनाकारण कट्टरतावादाला चिथावणी देणाऱ्या घटनांमध्येही अचानक वाढ होताना दिसते आहे. परिस्थिती किंवा धोरणांबद्दल असंतोष असू शकतो, परंतु ते व्यक्त करण्याचे आणि विरोध करण्याचे लोकशाही मार्ग आहेत. त्यांचे पालन न करता हिंसाचार करणे, समाजातील एखाद्या विशिष्ट वर्गावर हल्ला करणे, विनाकारण हिंसाचार करणे, भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, ही गुंडगिरी आहे असे मोहन भागवत म्हणाले.

हे ही वाचा…दीक्षाभूमीचा स्तुप दिसतो सुंदर…पण्, त्यासाठी तब्बल ४५ वर्षांचा संघर्ष…

देशहितापेक्षा स्वार्थाच्या राजकारणाला महत्व

देशातील विविधतेला तोडण्याचे व फुटीरवाद तसेच असंतोष निर्माण करत अराजकता निर्माण करण्याचेदेखील प्रयत्न सुरू आहेत. काही घटकांच्या असंतोषाला हवा देऊन तो घटक समाजापासून वेगळा आणि व्यवस्थेविरुद्ध आक्रमक बनवला जात आहे. त्यानंतर व्यवस्था, कायदा, शासन, प्रशासन इत्यादींबद्दल अविश्वास आणि द्वेष वाढवून अराजकता आणि भीतीचे वातावरण निर्माण करण्यात येत आहे. काही लोक यासाठी राजकारणाचा उपयोग करत आहेत अशा शब्दांत भागवत यांनी टीका केली. देशहितापेक्षा स्वार्थाच्या राजकारणाला जास्त प्राधान्य देण्यात येत आहे. पर्यायी राजकारणाच्या नावाने आपली विनाशकारी कार्यसूची पुढे नेणे ही त्यांची कार्यपद्धती आहे. अनेक देशांमध्ये असे प्रकार घडले आहेत. भारतातदेखील सीमेवरील भाग तसेच आदिवासी लोकसंख्या असलेल्या भागात असे प्रकार जास्त दिसून येत आहेत.

हे ही वाचा…“धर्म अनेक आहेत, पण त्या सगळ्यांच्या वरचा धर्म भारताचा प्राण आहे”, सरसंघचालक मोहन भागवतांचं संघ मुख्यालयात भाष्य!

जीविताचे व मालमत्तेचे रक्षण करावे लागेलं

देशात विनाकारण कट्टरतावादाला चिथावणी देणाऱ्या घटनांमध्येही अचानक वाढ होत आहे. परिस्थिती किंवा धोरणांबद्दल असंतोष असू शकतो, परंतु ते व्यक्त करण्याचे आणि त्यांना विरोध करण्याचे लोकशाही मार्ग आहेत. त्यांचे पालन न करता हिंसाचार करणे, समाजातील एखाद्या विशिष्ट वर्गावर हल्ला करणे, विनाकारण हिंसाचार करणे, भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, ही गुंडगिरी आहे. याला भडकावण्याचे प्रयत्न आहेत किंवा ते नियोजनबद्ध पद्धतीने केले जात आहेत. नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवादरम्यान श्री गणपती विसर्जनाच्या मिरवणुकांवर विनाकारण दगडफेकीच्या घटना आणि त्यानंतर निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती हे त्याच व्याकरणाचे उदाहरण आहे. अशा घटना घडू न देणे, घडल्यास त्यावर ताबडतोब नियंत्रण ठेवणे, हलगर्जी करणाऱ्यांना तत्काळ शिक्षा करणे हे प्रशासनाचे काम आहे. पण ते पोहोचेपर्यंत समाजालाच स्वत:च्या व प्रियजनांच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण करावे लागते असे आवाहन भागवत यांनी केले.