सरसंघचालक मोहन भागवत यांना उज्जैनला होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने आयोजित वैचारिक कुंभमेळ्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी आलो आणि त्यांनी निमंत्रण स्वीकारले आहे. कुठल्याही राजकीय विषयावर चर्चा न होता केवळ कुंभमेळ्याची माहिती त्यांना देण्यात आल्याचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले.
नागपुरात आल्यावर सकाळी ११ वाजताच्या सुमारास ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात पोहोचले. या वेळी उभयतात सुमारे तासभर बंदद्वार चर्चा झाली. पत्रकारांशी संवाद साधताना कुठल्याही राजकीय विषयावर प्रतिक्रिया न देता कुंभमेळ्याची माहिती दिली.
ते म्हणाले, यंदा उज्जैनला होणारा सिंहस्थ कुंभमेळा ऐतिहासिक होणार असून जगभरातील साधूसंत आणि विविध क्षेत्रांतील लोक येणार आहेत. एका विचार परंपरेवर चालणारा आणि शाही स्नानासाठी प्रसिद्ध असलेल्या या कुंभमेळ्यात यावेळी १२ ते १५ मे दरम्यान प्रथमच वैचारिक कुंभमेळा होत आहे. विज्ञान, अध्यात्म, ग्रामोद्योग, बेटी बचाव, पेढी पढाव, ग्लोबल व्हिजन, जैविक शेती, मूल्याधारित शिक्षण, स्वदेशी विचारधारा, देशभरातील जलस्थिती आणि त्यावर उपाययोजना, उच्चशिक्षण, रोजगार निर्मिती, देशभक्ती एक विचारधारा आदी विषयांवर चर्चासत्र होणार असून त्यासाठी देशभरातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. सरसंघचालकांनी १२ मे रोजी कुंभमेळ्याला येण्याचेही मान्य केले आहे.