दुकानात शिरून हत्या
मानकापूर येथील जगदंबा हाईट्समध्ये झालेल्या मोहित पीटर याच्या खुनातील चार आरोपींना जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश एस.ए. अली यांनी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तंबी ऊ र्फ जेम्स बबलू ऊर्फ क्लेमंट गबरेल (२१), ब्रायन ऊर्फ इब्राहिम बॅस्टिन कॅनेथ (२१), रा. दोन्ही मार्टीननगर, सचिन ऊर्फ अण्णा पलटी डॅनिएल गबरेल (२७) आणि आशीष ऊर्फ मॅडी वीरेंद्र राठोड (२६) अशी दोषींची नावे आहेत. या प्रकरणातील इतर पाच आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष सुटका करण्यात आली.
ही घटना २६ जून २०१५ रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली होती. मोहित मार्टिन पीटर हा मानकापूर येथील जगदंबा हाईट्सस्थित मार्लिन बिल्डिंग मटेरियल ट्रान्सपोर्टच्या दुकानात बसला होता. यावेळी तंबी आणि त्याच्या साथीदारांनी सशस्त्र हल्ला करून पीटरचा खून केला. या घटनेच्या दिवशीच गिट्टीखदान पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. त्यानंतर अन्य आरोपींना अटक करण्यात आली. याप्रकरणी एकूण ९ आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. याप्रकरणी जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे आणि अतिरिक्त सरकारी वकील राजेंद्र मेंढे यांनी सरकारतर्फे तर अॅड. पराग उके आणि अॅड. नदीम रिझवी यांनी आरोपींची बाजू मांडली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यावर न्यायालयाने तंबी, ब्रायन, सचिव आणि आशीष यांना दोषी ठरवत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणातील अन्य पाच आरोपींची मुक्तता करण्यात आली.