नागपूर : कोळसा व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याने बँकेतून काढलेली ९ लाखांची रक्कम लकडगंजमध्ये दोन दुचाकीस्वार चोरट्यांनी पळवली. सोमवारी भरदुपारी ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळसा व्यापारी नर्मदाकुमार अग्रवाल यांच्या कार्यालयात अनिल परसराम गणात्रा हा काम करतो. अग्रवाल यांनी अनिलला बँकेतून ९ लाख रुपये काढून आणण्यास सांगितले. दुपारी दोन वाजता तो दुचाकीने बँकेत गेला. पैसे काढून पिशवीत ठेवले. पिशवी दुचाकीच्या पेट्रोल टँकवर ठेवली आणि कार्यालयाकडे निघाला छाप्रूनगर चौकातून जात असताना पल्सर दुचाकीने आलेल्या दोघांनी अनिलकडील पैशाची पिशवी हिसकली आणि भरधाव पळून गेले. अनिलने आरडाओरड केली. परंतु, तोपर्यंत लुटारू पळून गेले होते. अनिलने मालक अग्रवाल यांना फोन करून माहिती दिली. लकडगंज पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.
हेही वाचा – नागपूर : मुलीला भेटायला आलेल्या प्रियकराला बघताच वडिलांचा संताप अनावर आणि..
हेही वाचा – यवतमाळ: “थँक्यू मिस्टर शिंदे..!” एका शिवसैनिकाचे पत्र तुफान व्हायरल
टीप देऊन लुटमार
अनिल हा नेहमीप्रमाणे बँकेत पैसे काढायला गेला होता. अनिलबाबत कुणीतरी जवळच्या व्यक्तीने टीप दिली असावी. त्यामुळे त्याचा नियोजनबद्ध पाठलाग करण्यात आला. बँकेतून पैसे काढून कार्यालयाच्या रस्त्याने लागताच दोन्ही लुटारूंनी पाठलाग करून पैशाची बँग हिसकावली. त्यामुळे या लुटमारीवर पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. लुटमारीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून लुटारू पळून गेलेल्या रस्त्यावरील सर्व फुटेज तपासणे सुरू केले आहे. त्यामुळे काही तासांतच या लुटमारीचा छडा लावण्याचा दावा पोलिसांनी केला आहे.