चंद्रपूर : चंद्रपूर, यवतमाळ व अन्य जिल्ह्यांमधील वेकोलि खाण क्षेत्रात, क्षेत्रालगतच्या वसाहती तसेच ग्रामीण भागात वेकोलि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित व बेजबाबदार वृत्तीमुळे कोळसा चोरींचे प्रमाण वाढले असून यातून विविध टोळ्या निर्माण झाल्या आहेत. या टोळ्यांकडून अवैध धंद्यांना प्रोत्साहन मिळाल्याने गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. या क्षेत्रात टोळीयुद्ध, रक्तरंजित संघर्ष व निर्घृण हत्यांसारखे प्रकार राजरोसपणे सुरू असल्याने वेकोलि क्षेत्रांमध्ये आधुनिकीकरणाचा अवलंब करून ‘ड्रोन’द्वारे देखरेख ठेवावी तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, असे निर्देश राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी वेकोलि प्रबंधनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुनावणीदरम्यान दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – श्रावण सोमवार : बेल म्हणतेय माझ्यासाठी घातवार..

उपरोक्त विषयाला घेऊन त्रस्त मागासवर्गीय नागरिक तसेच ग्रामीण भागातील प्रकल्प पीडितांनी आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन अहीर यांनी वेकोलि घुग्गुस येथे सुनावणी घेत या प्रश्नी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यावेळी वेकोलि आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. सुनावणीदरम्यान अहीर यांनी वेकोलितील वाढत्या गुन्हेगारीला वेकोलि प्रबंधनास जबाबदार ठरवत या गुन्हेगारीच्या उच्चाटनाकरिता अंतर्गत व परिसरातील सुरक्षा यंत्रणा अत्याधुनिक व सुसज्ज ठेवण्याची सूचना केली.

हेही वाचा – ‘वाढदिवस आहे भावाचा, सत्कार आहे खड्डय़ांचा’; राज्य महामार्गावर अनोखे आंदोलन

पेट्रोलिंग व शस्त्रसज्ज सुरक्षा रक्षकांच्या संख्येत वाढ करीत स्थानिक पोलीस विभागाशी समन्वय व संपर्क प्रस्थापित करीत त्यांच्या सहकार्याने वेकोलि क्षेत्रातील चोऱ्या व गुन्हेगारीवर अंकुश घालण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनीही काही सूचना केल्या. वेकोलि क्षेत्राच्या १० किमी अंतरावर ‘स्क्रॅप’ दुकानांना परवानगी देऊ नये, वेकोलि व्यवस्थापनाने स्वतः ड्रोनची खरेदी करावी, असे त्यांनी सुचवले. यावर, ज्यादा मनुष्यबळ असलेल्या ठिकाणी कामगारांना सुरक्षाकामी नियुक्त करावे, अशी सूचना अहीर यांनी उपस्थित वेकोलि अधिकाऱ्यांना केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monitor by drone in wcl area hansraj ahir instructs rsj 74 ssb
Show comments