नागपूर : मानवी वस्तीत माकड शिरल्यानंतर कित्येकदा ते माणसांसाठी त्रासदायक ठरते. तर शेतातही माकडांच्या माकडउड्या पीक नुकसानीसाठी कारणीभूत ठरतात. हे चित्र वाईटच आहे, पण म्हणून त्यांना पळवण्यासाठी इतर साधनांचा वापर न करता चक्क बंदूकीच्या गोळ्या झाडणे कितपत योग्य आहे. यात त्याचा मृत्यूही होऊ शकतो आणि कायमचे अपंगत्त्व येऊ शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सेमिनरी हिल्सवरील वनखात्याच्या अखत्यारितील आणि भारतातील पहिल्या ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्रात दोन दिवसांपूर्वी असेच एक प्रकरण् आले. हे माकड मानवी वस्तीत शिरले म्हणून त्याला पळवण्याऐवजी आणि जेरबंद करुन जंगलात सोडण्याऐवजी त्याच्यावर चक्क बंदूकीने गोळी झाडण्यात आली. माणसाने गोळी चालवली, पण त्याचे पायाचे हाडच मोडले नाही तर पायच तुटला. वास्तविक लोकसंख्या वाढीमुळे माणूस वन्यप्राण्यांचा अधिवास हिरावत चालला आहे. त्याच्या हक्काच्या अधिवासात तो परत आला तर माणूसच त्याला गोळी घालून हाकलत आहे. ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रात हे जखमी माकड आल्यानंतर त्याची क्ष-किरण तपासणी करण्यात आली. यात त्याचा पाय तुटलेला तर दिसलाच, पण त्याच्या पायात लहानलहान गोळ्या देखील होत्या. त्या आत गेल्यामुळे हाडाचे तुकडे झाले होते. या केंद्रात त्याच्यावर योग्य ते उपचार करुन त्याला पुन्हा मुळ अधिवासात परत पाठवले जाईल. मात्र, त्याच्या आंतरिक दु:खावर, वेदनेवर फुंकर घालूनही ती कायम राहणार आहे.

हेही वाचा…लिपिक टंकलेखक, कर सहायक पदासाठी कौशल्य टंकलेखन चाचणीची तारीख जाहीर

कळमेश्वर वनपरिक्षेत्रातून या माकडाला ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, यानंतरही अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. निवडणूक काळात सर्वच आचारसंहिता होती. या कालावधीत ज्यांच्याकडे वैयक्तिकरितया बंदुका आणि त्याचा परवाना होता, त्यांना त्या बंदुका संबंधीत पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश होते. कदाचित त्यांच्याकडे बंदुकीचा परवाना आहे, त्यांनी ज्या जमा देखील केल्या असतील. मात्र, अवैधरित्या बंदुका बाळगणाऱ्यांचे काय, हाही प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यांच्यावर अंकुश ठेवणारा कुणीही नाही, हे या माकडाच्या घटनेनंतर स्पष्ट झाले आहे. या माकडावर ज्या बंदुकीने गोळी झाडण्यात आली, ती कदाचित पॉईंट एक किंवा दोनची एअर रायफल असेल, पण तरीही ती धोकादायक नक्कीच आहे. या बंदुकीतून निघालेल्या गोळीमुळे समोरचा माणूस किंवा वन्यजीव मृत्यूमुखी पडणार नाही, पण त्याला गंभीर इजा नक्कीच होऊ शकते. या माकडावर शस्त्रक्रिया केल्यानंतरच ती गोळी कोणती आहे, बंदूक कोणती आहे, ते कळेलच. मात्र, हा विषय अतिशय गंभीर आहे. या माकडाचे मागचे पाय काम करत नसल्याने काही दिवसात तो यमसदनी गेला असता. मात्र, कळमेश्वर वनपरिक्षेत्रातील लोकांच्या लक्षात ते आले आणि त्यांनी त्याला उपचारासाठी ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्रात दाखल केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monkey shot case forest department s seminary hills center nagpur treats injured animal rgc 76 psg