नागपूर : जगभरात मंकीपॉक्स रुग्ण वाढत असल्याने काही प्रगत देशात आरोग्य कर्मचाऱ्यांना मंकीपाॅक्स प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. परंतु, भारतात अद्याप आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी अशी लस उपलब्ध नाही. त्यामुळे राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही लस कधी मिळणार हा प्रश्न ते उपस्थित करत आहे.
मंकीपॉक्समुळे जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. नागपुरातील एम्समध्येही या आजाराचे निदान करणारी प्रयोगशाळा कार्यान्वित झाली आहे. यावर्षी जगभरात मंकीपाॅक्सचे १५ हजार ६०० रुग्ण आढळले असून त्यापैकी ५३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात मार्च २०२४ मध्ये मंकीपाॅक्सचा पहिला मृत्यू तर आतापर्यंत ३० रुग्ण नोंदवले गेले.
हेही वाचा…यवतमाळ : “सोयाबीनले भाव नाही, त भाजपाले मत नाही!” शेतकऱ्यांचा पोळ्यात संताप…
त्यामुळे ॲडव्हायझरी कमेटी ऑन इम्युनायझेशन प्रॅक्टिस (एसीआयपी)कडूनही मंकीपाॅक्स प्रतिबंधासाठी लहान मुलांसह जोखमेतील व्यक्तींना जिन्निओस ही प्रतिबंधात्मक लस देण्याचा सल्ला दिला गेला आहे. त्यानुसार फ्रान्स, जपान, स्पेनसह इतरही काही प्रगत देशात प्रतिबंधात्मक लसीचा उपयोग होत आहे. डॉक्टार, आरोग्य कर्मचारी थेट रुग्णांच्या संपर्कात येत असल्याने त्यांनाही संक्रमणाचा धोका आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही या लसीची मागणी होत आहे.
“पाकिस्तान, बांगलादेशात मंकीपाॅक्सचे रुग्ण वाढत आहेत. भारतातही काही रुग्णांची नोंद झाली आहे. फ्रांस, जपानसह काही विकसित देशात जोखमेतील रुग्णांसाठी प्रतिबंधात्मक लस वापरली जात असून तिचा चांगला परिणाम दिसत आहे. त्यामुळे येथील डॉक्टरांनाही शासनाने अशी लस उपलब्ध करण्याची गरज आहे.”-डॉ. समीर गोलावार, राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षक संघटना.
हे ही वाचा…शिक्षण विभागातील बदल्यांसाठी ‘रेट कार्ड’, शिक्षण मंत्री म्हणाले बदल्याच बंद तर…
‘‘मंकीपाॅक्स हा संक्रमित होणारा आजार आहे. त्यामुळे डॉक्टरांनाही धोका आहे. करोना काळातही अनेक डॉक्टरांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून शासनाने तातडीने प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करावी.”-डॉ. सजल बंसल, राज्य महासचिव, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ बॉन्डेड निवासी डॉक्टर.
‘सध्या राज्यात मंकीपाॅक्सचे रुग्ण नसले तरी खबरदारी म्हणून सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागाकडून उपचारासाठी सर्व व्यवस्था केली गेली आहे. लसीबाबत केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे.”-दिनेश वाघमारे, सचिव, वैद्यकीय शिक्षण विभाग, मुंबई.
मंकीपॉक्सची लक्षणे काय?
मंकीपॉक्सबाधित रुग्णांमध्ये ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी आणि पुरळ उठणे अशी लक्षणे आढळतात. ही लक्षणे सहसा जीवघेणी नसली तरी काही प्रकरणांमध्ये ते गंभीर असू शकते. लक्षणांमध्ये सुरुवातीला शरीरावर पुरळ उठण्यास सुरुवात होते. पुरळ उठण्याची सुरुवात चेहऱ्यापासून होते आणि शरीराच्या इतर भागांमध्ये पसरते. यामुळे जखमा होऊ शकतात. पू झाल्यानंतर जखम वाढून त्यात खड्डा पडतो.