अमरावती : यंदा मोसमी पाऊस दमदार पडेल, अशी आनंदवार्ता भारतीय हवामान विभागाने दिली आहे. जून ते सप्टेंबर या चारही महिन्यांत मोसमी पावसासाठी प्रादेशिक आणि जागतिक हवामानविषयक स्थिती अनुकूल राहील. देशात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे, १०५ टक्के पाऊस पडेल, असा दीर्घकालीन अंदाज वर्तविण्यात आला आहे. पण, येथील हवामानतज्ज्ञांनी मात्र, शेतकऱ्यांना नियोजन करण्याआधी वाट पाहण्याचा सल्ला दिला आहे.
सध्याच्या अंदाजामुळे हुरळून जाऊ नये. हवामान खात्याकडून मोसमी पावसाचा दुसरा सुधारीत अंदाज मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात देण्यात येईल. हा अंदाज जास्त विश्वसनीय असतो. तेव्हा शेतकऱ्यांनी तोपर्यंत शेतीबाबत नियोजन करू नये. २५ मेपर्यंत स्थिती स्पष्ट होईल अशी माहिती येथील श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामानतज्ज्ञ प्रा. अनिल बंड यांनी दिली आहे.
हवामान खात्याने या वर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार यंदा भारतात सरासरी ८७० मिलिमीटर पाऊस पडेल, असा दिलासादायक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याचाच अर्थ यंदा भारतात सरासरीच्या १०५ टक्के पाऊस पडू शकतो. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वी ‘एल निनो’ संपणार असून ‘ला निनो’ प्रभावी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतात चांगला पाऊस पडणे अपेक्षित आहे. जेव्हा ‘एल निनो’ सक्रिय असतो त्यावेळी भारतात दुष्काळी परिस्थिती असते आणि ‘ला निनो’ प्रभावी असतो तेव्हा मोसमी पाऊस चांगला पडतो, असा सर्वसाधारण अनुभव आहे. परंतु यामध्ये थोडा जर-तर सुद्धा आहे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियन हवामान खात्याच्या अंदाजानुसार ‘ला निनो’ संपलेला आहे. त्यामुळे मान्सूनचा अंदाज देणे अवघड झालेले आहे. त्यांच्या अंदाजानुसार यावर्षी पावसाळ्यापुर्वी पर्यंत हिंदी महासागरातील हवामानशास्त्रीय स्थिती ही तटस्थ राहणार आहे. अशी परिस्थिती १२ वर्षांत पहिल्यांदाच उद्भवली आहे. म्हणजे यावर्षी पावसाळ्यापुर्वी आणि पावसाळ्यानंतर ‘ला निनो’ किंवा ‘एल निनो’ यापैकी कोणताही घटक सक्रिय नसेल. त्यामुळेच पुढील (मान्सून ) हवामानाचा निश्चित अंदाज देणे कठीण झाले आहे. आता हवामान शास्त्रज्ञांना अधिक सावध राहावे लागेल. तसेच अटलांटिक महासागरातील परिस्थिती वर सूक्ष्म नजर ठेवून तेथील अंतर्गत प्रवाह काय भूमिका पार पाडतात, याचा अभ्यास करावा लागेल. थोडक्यात, यंदा हवामान खात्याची सत्वपरीक्षा होणार असल्याचे प्रा. अनिल बंड यांनी म्हटले आहे.