नागपूर : ग्रामीण भागातील शाळा दुरुस्ती खरे तर पावसाळ्यापूर्वी व्हायला हवी, पण नागपूर जिल्हा परिषदेने पावसाळा सुरू झाल्यावर यासंदर्भातील आढावा घेतला.
नुकतीच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्या उपस्थितीत नुकतीच जिल्हा शैक्षणिक गरजा निश्चिती समितीची आढावा बैठक पार पडली. यात जिल्हा परिषदांच्या क्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक शाळांची इमारत व वर्गखोली विशेष दुरुस्ती, स्वच्छतागृह दुरुस्ती यावर चर्चा झाली. जिल्ह्यात ५१९ शाळांची दुरुस्तीची गरज आहे. त्याचप्रमाणे २७८ वर्ग खोलीचे बांधकाम. ३७४ शाळांमध्ये संरक्षक भिंत बांधणे. ८२७ शाळांमध्ये शौचालय बांधणे, १२८ शाळांमध्ये कायमस्वरुपी स्वयंपाकगृह तयार करणे या विषयांवर बैठकीत चर्चा झाली.
हेही वाचा – Video : ताडोबात काळ्या बिबट्याची संख्या वाढली! पर्यटकांना सातत्याने दर्शन
खरे तर पावसाळा पूर्व नियोजनातच शाळा दुरुस्तीचा समावेश असतो. मात्र उन्हाळा गेला तरी याबाबत चर्चा झाली नाही आणि ऐन पावसाळा सुरू झाल्यावर जिल्हा शैक्षणिक गरजा निश्चिती समितीची आढावा बैठक झाली. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.