नागपूर : मान्सून यावेळी वेळेत पोहचणार अशी शक्यता असतानाच मान्सूनच्या वाटेतील अडथळे मात्र वाढत चालले आहेत. बिपरजॉय चक्रीवादळाचा मान्सूनच्या केरळमधील आगमनावरही परिणाम होऊ शकतो, असे भारतीय हवामान खात्याचे म्हणणे आहे.
आग्नेय अरबी समुद्र आणि केरळच्या दरम्यान पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रवाहाने साडेचार किलोमीटरची अपेक्षित उंची गाठली आहे. मान्सूनच्या आगमनासाठी आता सलग पावसाची प्रतीक्षा आहे. वादळ उत्तरेकडे सरकल्यानंतर, केरळमध्ये पावसाला सुरुवात होईल, तेव्हा मान्सूनचे आगमन जाहीर करण्यात येईल, असे भारतीय हवामान खात्याने सांगितले. मध्य पूर्व अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची निर्मिती झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी जाहीर केले. पुढील दोन दिवसांत वादळाची तीव्रता वाढत जाणार असल्याचेही खात्या’ने म्हटले आहे.
हेही वाचा >>> ‘मान्सून’चा मुहूर्त हुकला! आगमनाबाबत साशंकता; प्रवेश लांबणीवर!f
सध्या अरबी समुद्राचे तापमान सरासरीपेक्षा जास्त असल्याने वादळाला मोठी ऊर्जा मिळत आहे. सध्या वादळ मुंबईपासून एक हजार किलोमीटर नैऋत्येला असून, ताशी चार किलोमीटर वेगाने त्याचा उत्तरेकडे प्रवास सुरू आहे. पुढील २४ तासांमध्ये बिपरजॉय तीव्र चक्रीवादळाची श्रेणी गाठण्याची शक्यता आहे. आठ ते दहा जूनच्या दरम्यान कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र किनारपट्टीवर ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या काळात समुद्रही खवळलेला राहण्याची शक्यता असल्याने या क्षेत्रात मासेमारीसाठी कोणीही जाऊ नये, अशी सूचना भारतीय हवामान खात्यानने दिली आहे.