नागपूर : दिल्ली, राजस्थान, हिमाचल, हरियाणा, उत्तराखंड या राज्यांमधून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. तर, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेशच्या विविध भागांमधून हळूहळू मान्सून परतण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची चाहूल लागणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
भारतातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला असताना महाराष्ट्रातूनही येत्या काही दिवसांत त्याचा परतीचा प्रवास सुरू होईल. मात्र, अजूनही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २४ तासांत कोकण आणि विदर्भात मूसळधार, तर पुढील ४८ तासांत मुंबई, पुणे, ठाणे येथे पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरील क्षेत्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात पावसासाठी पूरक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळू शकते. दरम्यान भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पश्चिम बंगाल, सिक्किम, आसाम, मेघालयमध्ये पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढलेला असेल. तर उत्तर हिमालय क्षेत्रामध्ये काही भागांमध्ये पावसाच्या हजेरीसोबतच काही ठिकाणांवर तापमानाचा आकडाही कमी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा – कपाशीवर गुलाबी बोंडअळीचे संकट; शेतकरी चिंतेत, हिरवे स्वप्न…
हिमाचल आणि उत्तराखंडमधील पर्वतीय क्षेत्रांमध्ये काही ठिकाणी रिमझिम पावसाची शक्यता आहे. तर, बहुतांश भागात तापमान अपेक्षेहून कमी नोंदवले जाण्याचीही शक्यता आहे. येत्या काळात देशाच्या उत्तरेकडील थंडीची ही चाहूल महाराष्ट्रापर्यंत पोहोचणार असल्यामुळे हवामानात मात्र बदल होणार आहे.