अकोला : जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास कोसळला. काल रात्री देखील सुमारे एक तास जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र जलमय वातावरण झाले आहे. हवामान तज्ज्ञांनी जिल्ह्यात मोसमी पाऊस दाखल झाल्याचा अंदाज व्यक्त केला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी सुखावले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यात यंदा उन्हाचा पारा चांगलाच चढला होता. उष्णतेच्या लाटेचा जिल्ह्याला फटका बसला आहे. जिल्ह्यातील तापमानाने ४५ अं.से.चा टप्पा देखील ओलांडला. गेल्या दोन-तीन दिवसांपासून उन्ह व सावलीचा खेळ सुरू आहे. दरम्यान, सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तासापर्यंत पावसाचा जोर कायम होता. सर्वत्र पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे अनेक भागांतील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. शहरातील अनेक भागांत रात्रभर वीज पुरवठा नव्हता. पावसामुळे वीज यंत्रणेत बिघाड झाला असून दुरुस्तीचे कार्य सुरू होते.

हेही वाचा – वर्धा : भुकेल्या वन्यप्राण्यांचा आता पाळीव प्राण्यांवर हल्ला, वाघ की बिबट…

आज सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ९.७ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली. सर्वाधिक २५.६ मि.मी. पाऊस बाळापूर तालुक्यात पडला, तर अकोला तालुक्यात देखील १८.९ मि.मी. पाऊस झाला आहे. याशिवाय अकोट तालुक्यात ४.९ मि.मी., तेल्हारा २ मि.मी. व मूर्तिजापूर तालुक्यात ७.३ मि.मी. पाऊस पडला. पातूर व बार्शिटाकळी तालुक्यात पावसाची नोंद झाली नाही. सामान्य सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात आतापर्यंत ७६.७ टक्के पाऊस झाला आहे.

दरम्यान, आज सकाळपासून पुन्हा उन्हाचा पारा चढला होता. दिवसभर उन्ह चांगलेच तापल्यानंतर सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सुमारे दीड तासांपर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर कायम होता. या पावसामुळे अनेक भागात पाणी साचले असून नाल्यांमधील पाणी रस्त्यावर आले आहे. वादळी वाऱ्यामुळे वृक्ष उन्मळून रस्त्यावर पडले. या पावसामुळे शहरातील विविध भागांतील विद्युत पुरवठा पुन्हा एकदा खंडित झाला. उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा – रेल्वे आता अधिक वेगवान होणार, रेल्वे रुळांचे वजन ५२ किलोंवरून…

योग्य पाऊस झाल्यानंतरच पेरणीचा सल्ला

खरीप हंगामातील पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. शेतीची मशागत केल्यानंतर बियाण्यांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रांवर गर्दी केली. हंगामाच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला. योग्य पाऊस झाल्यानंतरच वाणाची पेरणी करण्याचा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला. आगामी महिन्याभरात पेरणीला वेग येणार आहे.

जिल्ह्यात पाच दिवस पाऊस

भारतीय हवामान विभागाच्या नागपूर येथील केंद्रातर्फे अकोला जिल्ह्यात ११ ते १६ जूनदरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी असेल, असा अंदाज आहे. नागरिकांनी वादळाच्या स्थितीत शक्यतो बाहेर जाणे टाळावे, झाडाखाली थांबू नये, वीज चमकत असताना मोबाइल, विजेची उपकरणे बंद ठेवावी, वाहने विजेचा खांब व झाडांपासून दूर ठेवावीत, अशी सूचना आपत्ती व्यवस्थापन विभागाने केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon rains in akola district heavy rain with lightning ppd 88 ssb
Show comments