नागपूर : देशाच्या उत्तरेकडील राज्यांमधून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला असताना आता महाराष्ट्रातून देखील मान्सून माघारी परतण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यात तापमानात वाढ सुरु झाली आहे. येत्या काही दिवसात मान्सून राज्यातून पूर्णपणे माघार घेईल. यादरम्यान राज्याच्या काही भागात पावसाच्या तुरळक सरी वगळता हवामान कोरडे राहील, असा अंदाज आहे.
माघारी फिरतांनाही राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. विशेषत: कोकण, गोवा आणि मुंबईत पावसाने धुमाकूळ घातला. पुण्याच्या घाट परिसरात देखील चांगला पाऊस झाला. गेल्या काही दिवसांपासून विदर्भासह राज्यातील काही भागात तापमान वाढीला सुरुवात झाली आहे. वातावरणाच्या उष्णतामानात वाढ होत आहे. दिवसा तापमान वाढलेले तर रात्री तापमानात मोठी घट होतांना दिसत आहे. पहाटे थंड वाऱ्याची झुळूक आणि दिवसा मात्र उन्हाच्या झळा तीव्र होताना दिसत आहे.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी आधीच देशाच्या ४५ टक्के क्षेत्रातून माघारी फिरला आहे. तर उर्वरित देशातून देखील मॉन्सून माघारी फिरण्याच्या तयारीत आहे. साधारणत: येत्या दोन दिवसांत देशातील एकूण ८५ ते ९० टक्के भागांतून मॉन्सून माघारी फिरणार आहे. असे असले तरी मान्सून फक्त रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यात आणखी ३ ते ४ दिवस राहील. ११ ऑक्टोबरच्या आसपास संपूर्ण राज्यातून माघार घेण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात पाऊस तर आता उन्हाचा चटका वाढू लागण्याने नागरिक ऑक्टोबर हिटचा अनुभव घेत आहे. राज्यात पूढील पाच दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.