नागपूर : दीर्घ प्रतीक्षेनंतर का होईना विदर्भात सर्वदूर खऱ्या अर्थाने मोसमी पावसाचे आगमन झाले. पश्चिम विदर्भात दाखल झालेल्या पावसाने पूर्व विदर्भाला पावसाची प्रतीक्षा करायला लावली. मात्र, ही प्रतीक्षा सध्यातरी संपली असून गुरुवारी रात्रीपासूनच सर्वदूर मध्यम ते मुसळधार पाऊस दाखल झाला.

जूनच्या दुसऱ्या आठवड्यात भारतीय हवामान खात्याने पश्चिम विदर्भात मोसमी पाऊस दाखल झाल्याची घोषणा केली. त्याठिकाणी पाऊसदेखील होता. इकडे पूर्व विदर्भ मात्र कोरडाच होता. पाऊस सातत्याने हुलकावणी देत असतानाच हवामान खात्याने पूर्व विदर्भात देखील मोसमी पाऊस दाखल झाल्याची घोषणा केली. मात्र, त्याचवेळी पावसाने दडी मारली होती. त्यामुळे वातावरणात देखील प्रचंड उकाडा होता आणि तापमानातसुद्धा वाढ होत होती. त्यातच प्रादेशिक हवामान खात्याने १५ जुलै पर्यंत मुसळधार पावसाची प्रतीक्षा करावी लागणार असा इशारा दिला. तो खोटा ठरवत दीर्घ प्रतिक्षेनंतर का होईना गुरुवारी नागपूरसह पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पाऊस दाखल झाला.

हेही वाचा…रेल्वेने उडवले आधी तीन वाघ, आता बिबट..

प्रत्यक्षात मोसमी पावसाचे संकेत गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेल्या या पावसाने दिले. त्यामुळे सर्वात जास्त आनंद शेतकऱ्यांना झाला. पेरणीसाठी असाच पाऊस जास्त लाभदायक ठरतो आणि त्यामुळेच हा पाऊस कायम राहावं असे शेतकऱ्यांना वाटत आहे. तर त्याचवेळी सर्वसामान्य नागरिक देखील या मध्यम स्वरूपाच्या पावसाने आनंदी झाले आहेत. गुरुवारी रात्रीपासून नागपूर शहरात पावसाला सुरुवात झाली आणि अजूनही मध्यम स्वरूपात कोसळणारा हा पाऊस कायम आहे. तर दुसरीकडे वर्धा जिल्ह्यात सुद्धा पावसाची रिपरिप सुरूच आहे. पाऊस सार्वत्रिक असल्याने ग्रामीण भागात दिलासा मिळाला आहे.

गोंदिया जिल्ह्यात मध्यरात्रपासून पावसाला सुरुवात झाली आणि सकाळी पावसाचा जोर आणखी वाढला. कुठे मुसळधार तर कुठे मध्यम स्वरूपात पाऊस सुरू आहे. वाशीम जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. कुठे ढग दाटून आले तर कुठे पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली.रिमझिम पाऊस सुरूच असून आभाळ भरून आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात देखील रात्रभर पाऊस झाला.

हेही वाचा…१६ लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; सेक्शन कमांडरपदी होत्या सक्रिय

सध्या पाऊस थांबला असला तरी आभाळ भरून आहे. अमरावती जिल्ह्यात पाऊस नाही, मात्र आभाळ ढगांनी भरून आले आहे. हा पाऊस असाच दोन-तीन दिवस कायम राहिला तर शेतकऱ्यांना पेरणीसाठी तो फायद्याचा ठरेल, असे या क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्यातरी पावसाने दिलासा दिला आहे. हवामान खात्याने नागपूरसह वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा दिला आहे. यावेळी विजांच्या कडकडाटासह ताशी ४० ते ५० च्या गतीने वारे वाहतील असा अंदाज आहे. तर वाशीम, यवतमाळ, गडचिरोली, अमरावती येथेही मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे. तर या जिल्ह्यांमध्ये देखील ताशी ३० ते ४० च्या गतीने वारे वाहतील असा अंदाज आहे.