नागपूर : येत्या २४ तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यादरम्यान ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. त्यामुळे हवामान खात्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावर्षी नैऋत्य मोसमी वारे वेळेआधीच महाराष्ट्रात दाखल झाले. जूनच्या पहिल्याच आठवड्यात राजधानी मुंबईसह अनेक शहरांमध्ये मोसमी पाऊस दाखल झाला. तर जूनच्या दुसऱ्या आठवड्यात विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आणि प्रामुख्याने पश्चिम विदर्भात मोसमी पावसाने हजेरी लावली. वेळेआधीच दाखल झालेला मोसमी पाऊस आणि हवामान खात्याने यावर्षी अधिक पावसाच्या दिलेल्या अंदाजामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये शेतीच्या कामांना वेग आला. त्यानंतर मात्र पावसाने चांगलीच दडी मारली. आठवडाभराहून अधिक काळ मोसमी पावसाने ब्रेक घेतला. त्यामुळे अनेक ठिकाणी तापमानात वाढ झाली आणि त्याचबरोबर उकड्यात देखील वाढ झाली.

हेही वाचा…वहिनीचा जीव घेणाऱ्या दिराला जन्मठेप, बुलढाणा न्यायालयाचा निकाल; न्यायाधीशांनी केली होती…

विदर्भात तापमानवाढ आणि उकाडा जर अधिकच होता. आता मात्र जून महिन्याच्या अखेरीस पुन्हा एकदा मोसमी पावसाने राज्यात पुनरागमन केले आहे. अरबी समुद्रामध्ये मोसमी पावसाच्या वाऱ्याने पुन्हा एकदा जोर धरला असून, हे वारे आता देशभरातील बहुतांश क्षेत्र व्यापताना दिसत आहेत. याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील मोसमी पावसाची समाधानकारक हजेरी असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच दक्षिण कोकणात पावसाचा “ऑरेंज अलर्ट” दिला आहे. विदर्भातही वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. अरबी समुद्रात मोसमी पावसाच्या वाऱ्यांचा वेग प्रगतीपथावर असतानाच बंगालच्या उपसागरातील मोसमी पावसाचे वारे मात्र कमकुवत अजूनही कमकुवत आहेत. त्यामुळे या भागांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण नाही, असेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा…जलसंकटाचे काळे ढग कायमच; मागील वर्षीच्या तुलनेत राज्यातील धरणांमधील जलसाठ्यात ५.८६ टक्के घट

दरम्यान, मोसमी पावसाने महाराष्ट्र व्यापल्यानंतर आता हे वारे उत्तरेच्या दिशेने पुढे सरकताना दिसत आहेत. येत्या तीन ते चार दिवसात या भागांमध्ये मान्सून आणखी जोर धरणार असल्याचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. पूर्व विदर्भाला मात्र पाऊस सातत्याने हुलकावणी देत आहे. पश्चिम विदर्भात हवामान खात्याने मोसमी पावसाची घोषणा केली तेव्हा त्याठिकाणी पाऊस देखील होता. मात्र, पूर्व विदर्भात जूनच्या तिसऱ्या आठवड्यात मोसमी पावसाची घोषणा केली तेव्हा पावसाने मात्र दडी मारली होती. त्यामुळे पावसाळ्याचा पाऊस असा पूर्व विदर्भात झालाच नाही. सकाळी आभाळी वातावरण, दुपारी कडकडीत ऊन आणि सायंकाळी पुन्हा आभाळी वातावरण अशी स्थिती पूर्व विदर्भात आहे. कमी झालेल्या कमाल तापमानात पुन्हा वेगाने वाढ होत आहे. तापमान पुन्हा एकदा चाळीशी ओलांडण्याची चिन्हे आहेत. या विचित्र हवामानामुळे उकड्यात प्रचंड वाढ झाली आहे. सध्यातरी पूर्व विदर्भाला उकड्यापासून दिलासा मिळण्याची कोणतीही चिन्हे नाहीत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon returns in meteorological department issues thunderstorm warning for maharashtra rgc 76 psg