स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात
स्थलांतरित पक्ष्यांच्या भारतातील आगमनाला सुरुवात झाली असून अमरावती जिल्ह्यात सलग दुसऱ्या वर्षीसुद्धा मॉन्टेग्यु हॅरिअर या पक्ष्याने हजेरी लावली आहे. अमरावतीच्या वाईल्डलाईफ अँड एनव्हायर्नमेंट कन्झर्वेशन सोसायटी (वेक्स)च्या पक्षी अभ्यासकांना सर्वेक्षणादरम्यान यावर्षीसुद्धा या पक्ष्याचे दर्शन झाले. गेल्या वर्षी १२ ऑक्टोबर २०१४ ला या जिल्ह्यातीलच जळका तलाव परिसरात तो दिसला होता.
भारतात दरवर्षी हिवाळयात मोठय़ा संख्येने युरोप, सायबेरिया, मंगोलिया, तिबेट आदी प्रदेशातून पक्ष्यांच्या विविध प्रजाती स्थलांतर करून येतात. भारतातील समुद्र किनारे, नद्या, तलाव, पाणवठे तसेच जंगल प्रदेशात हे स्थलांतरित पक्षी हिवाळयात मुक्काम करतात आणि हिवाळा संपला की सारे परत जातात. अमरावतीच्या वेक्स या संस्थेचे पक्षी अभ्यासक निनाद अभंग, मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर, किरण मोरे यांना जिल्ह्यातील गवताळ कुरणांवर सध्या स्थलांतर करून आलेल्या शिकारी पक्षी पेरीग्रीन फाल्कन, प्यॅलीड हॅरिअर, मार्श हॅरिअर या पक्ष्यासमवेत मॉन्टेग्यु हॅरिअर हा पक्षीसुद्धा दिसून आला. अमरावती जिल्ह्यात या पक्ष्याची नोंद यापूर्वी डिसेंबर २०१४ला करण्यात आली आहे. मॉन्टेग्यु हॅरिअर हा पक्षी युरोपातील काही देशांमधून भारतातील मध्यप्रदेश व पश्चिम घाटात तसेच दक्षिण अफ्रिकेत हिवाळादरम्यान स्थलांतर करुन जातो. या पक्ष्याचे शास्त्रीय नाव सर्कस पायगार्गस असे असून त्याची मराठी ओळख मॉन्टेग्यु भोवत्या किंवा हारीन अशी आहे. या पक्ष्याप्रमाणेच दिसणारा प्यॅलीड हॅरिअर हा पक्षी मात्र हिवाळयात भारतात सर्वत्र आढळून येतो. प्यॅलीड हॅरिअर व मॉन्टेग्यु हॅरिअर हे दोन्ही शिकारी पक्षी सारखेच दिसत असल्यामुळे त्यांना ओळखणे कठीण आहे.
मॉन्टेग्यु हॅरिअर हा पक्षी आकाराने गरुड पक्ष्यापेक्षा लहान असून नर पक्षी रंगाने राखी पांढरा व पंखाची टोके काळी व पोटाखालून बदामी रेषा असतात. मादी रंगाने विटकरी असून शेपटी वर व पंखाच्या टोकांवर काळे पत्ते असतात. मानेवरची काळी रिंग ही या गटातील पक्ष्यांची खास ओळख आहे. हे पक्षी तलावाजवळच्या गवताळ माळरानावर मुक्काम करून तेथील लहान पक्षी तसेच प्राण्यांची शिकार करतात. बरेचदा तलावावरील पक्ष्यांचीही ते शिकार करतात. जिल्ह्यात सध्या या दोन जोड्या आढळून आल्या असून वेक्सचे या तिन्ही अभ्यासकांसह सौरभ जवंजाळ, डॉ. गजानन वाघ हे सुद्धा त्याचा अधिक अभ्यास करीत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा