बुलढाणा : शेगाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याला हादरवणाऱ्या आणि जिल्हा ते राष्ट्रीय पातळीवरील आरोग्य यंत्रणांसमोर आव्हान निर्माण करणाऱ्या आकस्मिक केसगळती आणि टक्कल या गूढ आजाराच्या शेगावातील मुक्कामाला शनिवारी तब्बल एक महिना उलटला! या दीर्घ काळात ना रुग्णसंख्येला ‘ब्रेक’ लागला, ना अचूक उपचार सापडला, ना अग्रेसर आरोग्य संस्थेचा अहवाल प्राप्त झाला. यामुळे महासत्ता बनण्याची दिवास्वप्ने पाहणाऱ्या देशातील आरोग्य यंत्रणांची मर्यादा अधोरेखित झाली आहे.
देशाचे आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या गृह जिल्ह्यातील ही स्थिती. आजपासून ठीक एक महिन्यांपूर्वी, ८ जानेवारी २०२५ ला शेगाव तालुक्यातील तीन चार गावांत या अनामिक आजाराचे रुग्ण आढळून आले. दुहेरी आकड्यात असलेल्या या टक्कलग्रस्त रुग्णसंख्येने पाहतापाहता शंभरचा आकडा पार केला. गावांची संख्या वाढली, शेगावच्या सीमा ओलांडून नांदुरा तालुक्यातही आजार पसरला. जानेवारीअखेर रुग्णसंख्या २४६ वर गेली.
केंद्रीय आरोग्य राज्य मंत्र्यांचा जिल्हा असल्याने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (दिल्ली आणि चेन्नई)च्या शास्त्रज्ञाची चमू क्षेत्रीय युनानी, आयुर्वेद, होमियोपॅथी संस्थेचे तज्ज्ञ, राज्याच्या आरोग्य विभागाचे अधिकारी, अकोला शासकीय वैद्यकीय महाविध्यालयाचे तज्ञ असा मोठा फोजफाटा मुक्कामी येऊन गेला. जिल्हा आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी तळ ठोकून राहिले. मात्र तरीही या गूढ आजाराचे नेमके अचूक कारण, निदान आणि रामबाण उपचार देण्यात हे काहीसे कमी पडले. काही रुग्णांचे केस परत आल्याचा दावा करण्यात आला.
आता सोळा गावांत…
फेब्रुवारीमध्ये रुग्णसंख्या वाढीचा वेग कमी झाला, हाच काय तो दिलासा ठरावा. १ ते ७ फेब्रुवारीदरम्यान आणखी १३ रुग्ण वाढले. यामुळे रुग्णसंख्या २५९ पर्यंत गेली. मात्र, आणखी तीन गावांत टक्कलग्रस्त रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणांना धक्का बसला. शेगाव कालवड, बोंडगाव, कठोरा, भोनगाव, हिंगणा वैजिनाथ, घुई, माटरगाव, पहुजीरा व निंबी तर नांदुरा तालुक्यातील वाडी, अशा १३ गावांमध्ये रुग्ण सापडले होते. आता शेगाव तालुक्यातील कनारखेड गायगाव आणि वरखेड येथेही रुग्ण आढळून आले. परिणामी बाधित गावांची संख्या १६ झाली आहे.
पद्मश्री डॉ. बावस्कर यांचा निष्कर्ष काय?
विंचूदंशावरील अचूक उपायामुळे जगात पोहोचलेले पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी काही गावाना भेटी देत रुग्णांशी संवाद साधला. त्यांनी धान्य, पाणी, माती, विटभट्ट्यातील राख, कोळसा याचे नमुने नेले. तपासणीअंती त्यांनी केसगळती ‘सेलेनियम’मुळे झाल्याचे सांगितले. रुग्णांच्या शरीरातील सेलेनियमचे प्रमाण सामान्य स्थितीच्या तुलनेत १० पट जास्त असल्याने केसगळती होत असल्याचा त्यांचा नित्कर्ष आहे.
अहवाल लांबणीवर का?
हा अनामिक आजार नेमका काय, कशामुळे होतो, निदान काय, उपचार काय? असे अनेक प्रश्न एक महिन्याच्या कालावधीत ऐरणीवर आलेत. आता यावर कळस ठरावा, असा प्रश्न समोर आला आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री जाधव यांच्या खासगी जनसंपर्क कक्षाने ३ फेब्रुवारीच्या संध्याकाळी मंत्र्यांची दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद ठेवली. यात केसगळतीवरील (आयसीएमआरच्या) अधिकृत अहवालाची माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र काही वेळातच पत्रपरिषद स्थगित झाल्याचे सांगण्यात आले. याला आता सहावा दिवस उजाडला, तरी मंत्र्यांना हा अहवाल जाहीर करण्यासाठी मुहूर्त मिळाला नाहीये! यामुळे भय इथले संपत नाही, अशी शेगाववासीयांची स्थिती आहे.